‘महावितरण’ला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार; नवीकरणीय ऊर्जेसाठीही दोन राष्ट्रीय पुरस्कारांचा मान
By आनंद डेकाटे | Published: February 16, 2024 02:51 PM2024-02-16T14:51:19+5:302024-02-16T14:51:40+5:30
यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला.
नागपूर : जागतिक दर्जाची तत्पर व डिजिटल ग्राहक सेवा तसेच दर्जेदार वीज पुरवठ्यासाठी वितरण यंत्रणेतील आमुलाग्र सुधारणांची दखल घेत इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (आयपीपीएआय) महावितरण कंपनीला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जेसाठी केलेल्या कामगिरीबद्दल प्रथम तर ग्राहकाभिमुख जनजागृतीबद्दल द्वितीय क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने महावितरणला गौरविण्यात आले. यासह वीज मिटरिंगसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल देखील महावितरणला विशेष पुरस्कार देण्यात आला.
आयपीपीएआयच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित कार्यक्रमात पॉवर अवार्ड २०२४ चे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाचे सचिव भूपिंदरसिंग भल्ला, केंद्रीय विद्युत प्राधीकरणाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद देव यांच्याहस्ते महावितरणचे मुख्य अभियंता (देयके व महसूल)संजय पाटील आणि वीज दर नियामक कक्षाचे अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. या पुरस्कारांबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.