राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम : उपराजधानीतील हरित क्षेत्र वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 12:28 AM2021-06-18T00:28:54+5:302021-06-18T00:29:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाच प्रकल्प आणि १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत आखलेल्या १३ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पाच प्रकल्प आणि १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत आखलेल्या १३ कलमी कार्यक्रमानुसार नागपुरातील हरित क्षेत्र वाढणार आहे. यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मंजूर प्रकल्पाचा गुरुवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापौर कक्षात आढावा घेतला. या संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
शहरातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे. विशेष करून पूर्व नागपूर आणि उत्तर नागपुरात वृक्षारोपण करून हा भाग प्रदूषणापासून मुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., मनपाचे आरोग्य सभापती संजय महाजन, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अभियंता महेश मोरोणे, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, विभागाच्या कार्यकारी अभियंता (पर्यावरण) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, नोडल अधिकारी स्वच्छ भारत मिशन डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, स्वयंसेवी संस्थेच्या लीना बुधे उपस्थित होत्या.
नागपुरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश दिले. तसेच पोहरा नदी काठालगत पिंपळ, वड, चिंच, नीम चे वृक्ष लावणे, सिमेंट रोडचा रस्ते दुभाजक, बर्डी उड्डाण पुलाच्या खाली सुध्दा वृक्षारोपण करण्यात येईल. तीन ठिकाणी हवा गुणवत्ता तपासणी संयंत्र, वाहतूक मार्गिकेत हरित क्षेत्र, शहरातील उद्यानात बागायती पालापाचोळ्याची विल्हेवाट लावणे , शहरातील वायू प्रदूषणाबाबत जनजागृती व क्षमता बांधणी कार्यक्रम, यांत्रिक रस्ते सफाईकरिता यंत्रचलित दोन वाहने आणि तीन वॉटर स्प्रिंकलर यांचा समावेश आहे. हवा गुणवत्ता तपासणी संयंत्र हा प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राबविणार आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांचे आणि प्रकल्प अंमलबजावणीचे संपूर्ण नियोजन केले आहे. त्यानुसार लवकरच या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येईल, असा विश्वास आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
मनपा पाच प्रकल्प राबविणार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार नीरीने नागपूर शहराचा प्रारूप वायु प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशीनुसार कृती आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली असून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत सहा प्रकल्पांसाठी १० कोटींची तरतूद केली आहे. यापैकी पाच प्रकल्प मनपा राबविणार असून त्यासाठी ५.८५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच १५ व्या वित्त आयोग अनुदानांतर्गत ६६ कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून यापैकी ३३ कोटीचे प्रकल्प प्रस्तावित आहे.