राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद नागपुरात
By admin | Published: January 12, 2016 03:00 AM2016-01-12T03:00:39+5:302016-01-12T03:00:39+5:30
नागपुरात १९ वी राष्ट्रीय राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
देशभरातील १२०० प्रतिनिधींचा सहभाग
नागपूर : नागपुरात १९ वी राष्ट्रीय राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. २१ व २२ जानेवारी रोजी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे होणाऱ्या या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शिवशंकर प्रसाद यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, केंद्रीय स्तरावरील सचिव उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच देशपातळीवरील आयएएस अधिकारी, आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक, खाजगी कंपनीचे प्रतिनिधी भाग घेणार आहेत. या परिषदेस देशातील १२०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या पूर्वतयारीबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात केंद्रीय अतिरिक्त सचिव उषा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विभागीय आयुक्त अनुप कुमार, केंद्र शासनाचे अवर सचिव डी. के. राणा, संचालक कल्पना एस. राव, महाराष्ट्र राज्याचे माहिती व तंत्रज्ञान संचालक मुथुकृष्णन संकरनारायण, वरिष्ठ सल्लागार माहिती व तंत्रज्ञान मनीष अनवाडिया, सहसचिव पी. करुपा सामी, नेस्कॉमचे केतन सावंत, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.
परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयावर चर्चासत्र होईल. यात शिक्षण, आरोग्य, उद्योग या क्षेत्रामध्ये ई-गव्हर्नन्सचा वापर तसेच प्रशासनात नागरिकांना उत्तम प्रकारचे साध्या सोप्या पद्धतीने ‘आॅनलाईन’ सेवा मिळण्यासाठी विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
या बैठकीस तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, उपायुक्त अप्पासाहेब धुळाज, मनपा उपायुक्त प्रमोद भुसारी, पोलीस उपायुक्त भारत तागडे, उपायुक्त बलकवडे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)