राष्ट्रीय मिर्गी दिवस; लपवू नका मिर्गीचा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:39 AM2018-11-17T09:39:26+5:302018-11-17T09:40:41+5:30

मिर्गी हा आजार अनेकांना होते, मात्र सामाजिक प्रतिष्ठेमुळे तो लपविला जातो. मात्र हा आजार औषधोपचाराने पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो.

National Epilepsy Day; Do not hide epilepsy | राष्ट्रीय मिर्गी दिवस; लपवू नका मिर्गीचा आजार

राष्ट्रीय मिर्गी दिवस; लपवू नका मिर्गीचा आजार

googlenewsNext
ठळक मुद्देजगात २४ कोटी रुग्ण२४ लाखांची भर भारतात १.२० कोटी पीडित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुलियस सिजर, नेपोलियन, वॅनगॉग, आलफ्रेड नोबल, अगाथा क्रिस्टी, टोनी ग्रेग, जॉन्टी ºहोड्स हे सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज. या सर्वांमध्ये एक साम्य होते. ते म्हणजे हे सर्व मिर्गीच्या आजाराने पीडित होते. मात्र आपल्या आजारावर मात करीत त्यांनी यशाचे शिखर गाठले व जगभरात प्रसिद्धी मिळवली. मिर्गी हा आजार अनेकांना होते, मात्र सामाजिक प्रतिष्ठेमुळे तो लपविला जातो. मात्र हा आजार औषधोपचाराने पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. त्यामुळे न्यूनगंड मनात बाळगण्यापेक्षा डॉक्टरांशी भेटा व उपचार सुरू करा, असे आवाहन विश्व ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे.
मिर्गी किंवा एपीलेप्सी या आजाराने जगात पाच कोटीपेक्षा जास्त लोक पीडित असून दरवर्षी २४ लाख रुग्णांची त्यात भर पडते. आजाराचे ८० टक्के रुग्ण गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये आढळतात. भारतात १ कोटी २० लक्ष लोक या आजाराने पीडित आहेत. लहान मुलांपासून ८०-९० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांनाही हा आजार होऊ शकतो. साधारणत: २०० पैकी एकाला हा आजार होतो. गैरसमज, गरिबी या कारणामुळे पीडित लोक डॉक्टरांकडे जात नाही. मात्र या आजाराचे योग्य निदान होणे आवश्यक असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले. मागील काही वर्षात नवनवीन शोध लागले असून आणखी शोधकार्य सुरू आहे. बरीच नवीन औषधे उपलब्ध झाली असून त्यांचे साईड इफे क्टही कमी आहेत. १ ते २ टक्के रुग्णांमध्ये मिर्गीचे झटके थांबत नाही, अशांसाठी आॅपरेशनचाही पर्याय उपलब्ध आहे. योग्य डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्या मार्गदर्शनानुसार औषधोपचार आणि योग्य आहार घेतल्यास ८० टक्के रुग्णांमध्ये हा आजार बरा होतो.

हे करावे, हे करू नये
आपल्यासमोर कुणाला मिर्गीचा झटका आल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णाचे कपडे सैल करावे. डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला एका कडेवर झोपवावे. अवतीभवतीची गर्दी कमी करून रुग्णापर्यंत शुद्ध हवा पोहचेल, याची काळजी घ्यावी. ५ ते ७ मिनिटांपर्यंत झटका चालल्यास तातडीने डॉक्टरांकडे हलवणे गरजेचे असल्याच डॉ. मेश्राम यांनी स्पष्ट केले. मिर्गी आजाराबाबत अनेक गैरसमज समाजात आहेत. झटका आलेल्या रुग्णाची दातखिळी उलविण्यासाठी प्रयत्न करू नये किंवा तोंडामध्ये चमचा टाकू नये. चप्पल, जोडे किंवा कांदा नाकाजवळ नेऊ नये. जबरदस्तीने हातपाय सरळ करण्याचे प्रयत्न करू नये, अशा सूचना डॉ. मेश्राम यांनी दिल्या.

ही आहेत आजाराची लक्षणे
मिर्गीचे वेगवेगळे प्रकार आहेत. मेंदूच्या कोणत्या भागात मिर्गीची सुरुवात झाली यावरून त्याची लक्षणे ठरतात. हाता-पायाला झटके येणे, बेशुद्ध होणे, आठवण न राहणे, वेगवेगळे भास होणे असे काही लक्षणे आढळून येतात. या आजारामध्ये परत परत झटके येतात, कारण मेंदूच्या पेशींमध्ये इलेक्ट्रीकल सिग्नल जनरेट होतात आणि ते मेंदूभर पसरतात. त्यामुळे काही काळासाठी मेंदूच्या कार्यामध्ये खंड पडत असल्याचे डॉ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.

आजार होण्याची कारणे
मिर्गीची सुरुवात कशी झाली हे समजून घेणे आवश्यक आहे. डोक्याला मार लागणे, पॅरालिसिसचा झटका येणे, जंतुसंसर्ग होणे, लहान असताना मार लागणे, मेंदूमध्ये ट्यूमर असणे आदी कारणे आहेत. यामध्ये दोन टक्के अनुवांशिकतेचा पण भाग असतो. परत परत झटके येण्याची अनेक कारणे आहेत. आपला आजार किंवा त्रास कमी झाला असे समजून औषध घेण्याचे टाळणे किंवा नियमित औषधे न घेणे किंवा औषधे घ्यायला विसरणे, वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, आहारात बदल होणे, अतिउत्साह, झोप कमी येणे आदी कारणांनी त्रास वाढू शकतो. सणवार साजरे करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीसारखे सण मिर्गी असणाऱ्यांसाठी धोकादायक आहेत. या काळात औषधे घेऊनसुद्धा अटॅक येण्याचे प्रमाण अधिक असते.

Web Title: National Epilepsy Day; Do not hide epilepsy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य