राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 02:43 PM2019-06-06T14:43:10+5:302019-06-06T14:45:42+5:30

बनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देशातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले.

National Fire Service College Cheated; FIR registered | राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची फसवणूक

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाची फसवणूक

Next
ठळक मुद्देबनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देशातील विविध ठिकाणच्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कंपन्यांच्या कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या देशातील ठिकठिकाणच्या विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांवर मानकापूर पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या घडामोडीमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नामांकित कंपन्या, संस्थांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळते. त्यामुळे आपल्याकडील अधिकारी असल्याचे सांगून ठगबाजांनी कागदांवर बनावट कंपन्या उभ्या केल्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे अनेकांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठविले. २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येत अशा बोगस विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यात हरियाणा, बिहार, राजस्थानसह अनेक ठिकाणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या गैरप्रकाराची सरकारकडे तक्रार झाल्यानंतर गोपनीय चौकशी सुरू झाली. त्यात तथ्य आढळल्याने संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्रालयातून १४ मे २०१९ ला राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय प्रशासनाला निर्देश मिळाले. त्यावरून महाविद्यालयातर्फे गुरूदेवसिंग दलजीतसिंग सैनी (वय ५९) यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली.
महाविद्यालय, शासन आणि संस्थांची फसवणूक करणारांमध्ये आरोपी अनिलकुमार (रा. नायगाव, जि. झांझर, बहादूरगंज, हरियाणा), जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सहारता (बिहार), पोशी हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्यपुरा (बिहार), नॅशनल शुगर अ‍ॅण्ड केमिकल्स लि. कटिहार (बिहार), भारत हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कॉर्पोरेशन लि. कटेहार (बिहार), हिंदुस्तान इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इक्विपमेंट लि. पूर्णिया (बिहार) टेकनेक कॉम्बो मेन्टेनन्स लि. कटिहार (जि. बिहार) आणि पॅसिफिक इंडिया प्रा. लि. अलवर (राजस्थान) यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून मानकापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणात अनेक धक्कादायक घडामोडी अपेक्षित असल्याचे मानकापूर
पोलीस सांगतात.

Web Title: National Fire Service College Cheated; FIR registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.