२०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाला मंजुरी
By admin | Published: July 29, 2016 02:46 AM2016-07-29T02:46:25+5:302016-07-29T02:46:25+5:30
लोकमत समूह आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रध्वज प्रकल्पाला ...
लोकमत समूह आणि मनपाचा संयुक्त उपक्रम : स्थायी समितीत शिक्कामोर्तब
नागपूर : लोकमत समूह आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रध्वज प्रकल्पाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. नागपुरातील कस्तूरचंद पार्क येथे २०० फूट उंचीचा हा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे.
नागपुरात उंच राष्ट्रध्वज उभारला जावा यासाठी लोकमत समूह गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. काही महिन्यापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त,सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे आदी उपस्थित होते.
या बैठकीत लोकमत समूह व महापालिका याच्या संयुक्त उपक्रमातून हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रध्वज प्रकल्पाला स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली विविध विभागांची मंजुरी यापूर्वीच घेण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी दिली.
ध्वजस्तंभ व झेंड्यावरील खर्च लोकमत समूह करणार आहे. महापालिकेतर्फे सौंदर्यीकरण व स्थापत्त्य कामे क रण्यात येतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे राहणार आहे. (प्रतिनिधी)
ध्वजस्तंभाची उंची २०० फूट असून ध्वजाचा आकार ९० बाय ६० फूट राहील.
लोकमत समूहातर्फे प्रकल्पाच्या जागेचे सौंदर्यीकरण, संकल्पना यासाठी वास्तुविशारद यांची नियुक्ती करण्यात येईल.
ध्वजस्तंभाच्या तांत्रिक बाबी आयआयटी व एनआयटी यांच्याकडून तपासण्यात येतील.
ध्वजस्तंभाची देखभाल व दुरुस्ती व व्यवस्थापन महापालिका करणार आहे.
तीन महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.