नागपूर रेल्वेस्थानकावर १०० फूट उंचीच्या राष्ट्रध्वजाची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:53 PM2019-02-07T23:53:13+5:302019-02-07T23:53:55+5:30
मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्रध्वजामुळे रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या १०० फूट उंच असलेल्या राष्ट्रध्वजाची गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात उभारणी करून यशस्वी तपासणी करण्यात आली. आता या राष्ट्रध्वजाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. या राष्ट्रध्वजामुळे रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.
भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा देशातील प्रत्येक नागरिकाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सामान्य माणसापासून ते सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या मनात तिरंग्याविषयी श्रद्धा, विश्वास आणि अभिमान आहे. हा तिरंगा झेंडा नेहमी नजरेसमोर दिसल्यास नागरिकांच्या मनात सदैव देशभक्तीची भावना वाढत राहील या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर १०० फूट तिरंगा झेंडा उभारण्याची संकल्पना रेल्वे बोर्डाकडे मांडली होती. त्यांच्या संकल्पनेचा विचार करून रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहाणी यांनी देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर १०० फूट उंच तिरंगा ध्वज उभारण्याला मान्यता दिली होती. त्यानुसार नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आरक्षण कार्यालयाच्या शेजारी गुरुवारी तिरंगा झेंडा उभारण्यात आला. लवकरच या तिरंगा झेंड्याच्या सभोवताल चारही बाजूंनी सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. टॉवरवर लावण्यात आलेल्या या झेंड्याच्या वर तीन लाईट आहेत. याशिवाय इतर दोन लाईटचा प्रकाश या राष्ट्रध्वजावर पडणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी येथील दृश्य आकर्षक राहणार आहे.
सेल्फी पॉईंटमध्ये भर
आरक्षण कार्यालयाच्या शेजारी दर्शनी भागात हिरवळीच्या मधोमध हा राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. या हिरवळीच्या समोर सेल्फी पॉईंट बनविण्यात येणार आहे. येथून प्रवासी राष्ट्रध्वज आणि रेल्वेस्थानकाच्या हेरिटेज इमारतीसोबत सेल्फी घेऊ शकणार आहेत.