राष्ट्रीय हातमाग दिवस; नागपुरातील ऐतिहासिक हँडलूम मार्केटची रयाच गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 07:00 AM2021-08-07T07:00:00+5:302021-08-07T07:00:02+5:30

Nagpur News १९५७ मध्ये गांधीबागेत हँडलूम मार्केट व सूत मार्केट अशा दोन भव्य इमारती बनविण्यात आल्या. १९८० पर्यंत या व्यवसायाची चलती होती; पण यांत्रिकीकरणामुळे या व्यवसायाबरोबरच नागपूरचे वैभव असलेल्या हँडलूम मार्केटची रया गेली.

National Handloom Day; Historic Handloom Market in Nagpur | राष्ट्रीय हातमाग दिवस; नागपुरातील ऐतिहासिक हँडलूम मार्केटची रयाच गेली

राष्ट्रीय हातमाग दिवस; नागपुरातील ऐतिहासिक हँडलूम मार्केटची रयाच गेली

googlenewsNext
ठळक मुद्दे७ ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यात येतो. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवसाची घोषणा केली होती. हातमाग गरिबीशी लढण्याचे हत्यार असल्याचे ते म्हणाले होते. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश उद्योगाप्रती जागरूकता आणणे व या उद्योगातील अडचणी

 

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात नागपुरात रोजगाराचा महत्त्वाचा स्रोत हातमाग व्यवसाय होता. हातमागावर साडी आणि दरी (चादरी) बनत असायच्या. मध्य नागपूर व उत्तर नागपुरात घरोघरी हा व्यवसाय चालायचा. गांधीबाग ही त्या काळची हातमागाच्या कापडांची सर्वांत मोठी बाजारपेठ होती. १९५७ मध्ये गांधीबागेत हँडलूम मार्केट व सूत मार्केट अशा दोन भव्य इमारती बनविण्यात आल्या. १९८० पर्यंत या व्यवसायाची चलती होती; पण यांत्रिकीकरणामुळे या व्यवसायाबरोबरच नागपूरचे वैभव असलेल्या हँडलूम मार्केटची रया गेली.

राजे रघूजी भोसले यांनी बंगालवर चढाई केल्यांनतर परतताना त्यांनी ओरिसा व छत्तीसगढ येथून हलबा कोष्टी समाजाच्या विणकरांना नागपुरात वसविले. मध्य नागपुरात घराघरात हा व्यवसाय होता. तेव्हा या व्यवसायाच्या बळावर हलबा कोष्टी हा समाज नागपुरातील सर्वांत श्रीमंत होता. त्या काळात साड्या, लुगडे हातमागावर कमी किमतीत बनत होते. तेव्हा नागपूरच्या १५ टक्के लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपाने व्यवसायातून रोजगार उपलब्ध होता. १९५० च्या आसपास उत्तर प्रदेशातून आलेल्या काही मुस्लिम कारागिरांनी हातमागावर दरी (चादर) बनविण्याचे काम सुरू केले. १९७० च्या काळापर्यंत उत्तर नागपुरात किमान ५०० च्या जवळपास दरी निर्मितीचे कारखाने होते. किमान ५० हजारांवर लोकांना रोजगार मिळाला होता. नागपूर, भंडारा येथून हातमागावर मोठ्या प्रमाणात साड्या, लुगडे, चादरी या गांधीबागेतील हँडलूम मार्केटमधून इतर राज्यांत पाठविल्या जात होत्या. या हँडलूम मार्केटच्या शेजारीच सूत मार्केट आहे. येथे या व्यवसायाला लागणारे सुताचे व्यापारी होते. औद्योगिकीकरणाने हातमाग व्यवसाय लयास गेला. पर्यायाने हलबा कोष्टी समाज त्यापासून दूर झाला. हॅँडलूम मार्केटच्या लोकांनी व्यवसाय बदलविले.

- त्या काळात आमचे वडील अडते म्हणून काम करायचे. मोठ्या प्रमाणात या मार्केटमधून साड्या व लुगडे इतर राज्यांत जात होते. तेव्हा या इमारतीत २१४ दुकाने होती. सूत मार्केटमध्ये धाग्यांचे व्यापारी होते. १९८० च्या नंतर पाॅवरलूम आले आणि रोजगाराबरोबरच या मार्केटवर अवकळा आली. सूत व्यापाऱ्यांनी कपड्यांची दुकाने टाकली. हातमाग व्यावसायिकांनी पडदे, दरी, रेडिमेडचे व्यवसाय टाकले.

नरेश नागपाल, रेडिमेड व्यवसायी 

- ७० वर्षांपूर्वी आमच्या वडिलांचा दरीचा कारखाना होता. त्यांनी किमान ४० वर्षे कारखाना चालविला. त्यावेळी उत्तर प्रदेशातून २० विणकर व परिसरातील ५० महिला आमच्याकडे काम करायच्या. आधुनिकीकरणामुळे हातमागावर बनणारी दरी पाॅवरलूमवर कमी खर्चात बनायला लागली. त्या काळी हातमाग व्यवसाय हा असंघटित होता. त्यामुळे सरकारनेदेखील गंभीरतेने घेतले नाही. परिणामी ही कला इतिहासजमा झाली आहे.

प्रकाश गणपतराव गोविंदवार, दरी उत्पादक 

- १९८० च्या दशकात नागपूरचा साडी उद्योग सरकारी खरेदीवर निर्भर झाला. पाॅवरलूममुळे हातमाग तोट्यात येत होता. त्यावेळी खासदार नरेंद्र देवघरे यांनी हातमागाला आधुनिक बनविण्याचा मंत्र दिला. पॉवरलूमवर साडी बनविण्यासाठी सरकारी मदत उपलब्ध करून दिली; परंतु तेव्हा हलबा कोष्टी समाजाने त्यांचा विरोध केला. हातमागाच्या समर्थनात समाजाने आंदोलन छेडले. काळानुरूप आम्ही बदल न केल्याने पाॅवरलूमवर बनलेल्या स्वस्त साडीने हातमागावर बनलेल्या महाग साडींना बाजाराच्या बाहेर केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विणकर समाज बेरोजगार झाला.

बबनराव धकाते, हातमाग कारखानदार 

 

 

Web Title: National Handloom Day; Historic Handloom Market in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस