राष्ट्रीय आराेग्य अभियानचे कंत्राटी कर्मचारी पुन्हा संपाच्या वाटेवर
By निशांत वानखेडे | Published: December 4, 2023 05:39 PM2023-12-04T17:39:56+5:302023-12-04T17:40:20+5:30
सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे.
नागपूर : शासकीय सेवेत समायाेजनाच्या मागणीसाठी गेल्या २५ ऑक्टाेबरपासून तब्बल ३६ दिवस कामबंद आंदाेलन करणाऱ्या राष्ट्रीय आराेग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्याचे आराेग्य मंत्री यांनी समायाेजनाबाबत सकारात्मक निर्णय दिला नाही तर १४ डिसेंबरपासून पुन्हा संप पुकारण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.
सरकारच्या आराेग्य अभियानात मागील २० वर्षापासून कंत्राटी तत्वावर व तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या या आराेग्य कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायाेजनाची मागणी लावून धरली आहे. त्यांचे आंदाेलन सुरू असताना ३१ ऑक्टाेबरला आराेग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रीगटात कर्मचाऱ्यांचा समायाेजनाचा विषय ठेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र आश्वासन न पाळल्याने आंदाेलन सुरुच राहिले.
राज्यातील ३४ हजार कर्मचारी आंदाेलनात असल्याने ग्रामीण भागातील आराेग्य व्यवस्था काेलमडली हाेती. यानंतर २९ नाेव्हेंबरला आराेग्य मंत्र्यांनी पुन्हा सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ३० नाेव्हेंबरला आंदाेलन स्थगित करण्यात आले. मात्र १३ डिसेंबरपर्यंत निर्णय आला नाही तर १४ पासून पुन्हा संप सुरू करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने दिला आहे.