माैद्यातील राष्ट्रीय महामार्ग खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:13 AM2021-09-16T04:13:15+5:302021-09-16T04:13:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ हा खड्डेमय झाला आहे. मार्गावर ठिकठिकाणी माेठमाेठे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ हा खड्डेमय झाला आहे. मार्गावर ठिकठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत असून, मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कधी जाग येणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या महामार्गाचे चौपदरीकरण व दुरुस्ती सहा वर्षापूर्वी करण्यात आली. सुरुवातीच्या काळात हा महामार्ग चांगला होता. परंतु मागील सहा महिन्यापासून या महामार्गाच्या काही भागात खड्डे पडायला सुरुवात झाली. पावसाळ्यात या खड्डयांचा आकार व खोली वाढत गेली. त्यात पावसाचे पाणी साचून राहात असल्याने वाहनचालकांना त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. खड्ड्यातून वाहने गेल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, या महामार्गावर धावणाऱ्या वाहनचालकांकडून टोल वसूल केला जातो. मात्र, महामार्गाच्या दुरुस्तीकडे कंत्राटदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचा आराेप नागरिकांनी केला आहे. कंत्राटदार कंपनीने या महामार्गावरील काही खड्डे गिट्टीची भुकटी टाकून बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खड्डे काही दिवसांनी पूर्ववत झाले. त्यामुळे या महामार्गाची नव्याने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.