विदर्भातील राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:24 AM2018-06-23T00:24:30+5:302018-06-23T00:25:14+5:30
रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नागपूरसह विदर्भातील विविध शहरांना रोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यासाठी कामाचे नियोजन करून गती देण्याचे निर्देश जारी करण्यात आले.
रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी नागपुरात बैठक झाली. तीत विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. या वेळी या खात्याचे मुख्य अभियंता व प्रादेशिक अधिकारी अंशुमन श्रीवास्तव, राष्ट्रीय राजमार्ग विभाग मुंबईचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, नागपूरचे अधीक्षक अभियंता बी.डी. ठेंग, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे क्षेत्रीय अधिकारी चंद्रशेखर, महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाच्या अधीक्षक अभियंता संगीता जयस्वाल तसेच विदर्भातील विविध विभागाचे अधिकारी व रस्ते कंत्राटदार उपस्थित होते.
बैठकीत रस्तानिहाय आढावा घेण्यात आला. कोणत्या रस्त्याचे काम कुठपर्यंत झाले आहे, त्यात काय अडचणी येत आहेत. कोणत्या रस्त्याचे काम थांबले आहे आहे, याची माहिती घेत अडथळे त्वरित दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. वनविभागाच्या परवानगीसाठी अडलेली रस्त्यांची कामे त्वरित कशी सुरू करता येतील यासाठी वनविभागाशी स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्देशांनुसार महामार्गावर बांधण्यात येणाऱ्या पुलांचे बांधकाम करताना तेथे बांध बांधण्याचीही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे जलसंचयनास मदत होणार आहे.