२०० किमीचे अंतर वाचविणारा राष्ट्रीय महामार्गही वन कायद्याच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:11+5:302021-07-09T04:07:11+5:30
- महत्प्रयासाने हायवे बनतोय साडेपाच मीटरचा - वन कायद्याच्या नावाखाली अडथळे - भारतमाला प्रकल्पाचा भाग असूनही वेग मात्र कमी ...
- महत्प्रयासाने हायवे बनतोय साडेपाच मीटरचा
- वन कायद्याच्या नावाखाली अडथळे
- भारतमाला प्रकल्पाचा भाग असूनही वेग मात्र कमी
...
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात नव्या राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम वेगात सुरू आहे. मात्र याच प्रकल्पाचा भाग असलेल्या महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात केंद्रीय वन कायद्याच्या नावाखाली अडथळे सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाला तर महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त भामरागड ते नारायणपूर (छत्तीसगड)चे अंतर २०० किलोमीटरने घटणार आहे. सध्या २६५ किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे, एवढेच नाही या दोन्ही राज्यातील आदिवासी जनतेला दोन दिवसाचा पायी प्रवास करून भामरागडवरून नारायणपूरला पोहचावे लागत आहे.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून भामरागड १७७ किलोमीटर अंतरावर, तर चंद्रपूरपासून १८२ किलोमीटरवर आहे. हा राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यास भामरागड ते नारायणपूरचे अंतर ६० किलोमीटरवर येणार आहे. याचा थेट परिणाम क्षेत्राच्या विकासावर होणार आहे. हा महामार्ग झाल्यास हेमलकसाचे नैसर्गिक सौंदर्य, वनवैभव, ग्लोरी ऑफ आलापल्ली पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वेगाने वाढू शकते.
...
‘विदर्भच्या काश्मीर’पर्यंत पोहचणे होईल सोपे
भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे गाव उंच पहाडावर आणि घनदाट जंगलात आहे. यामुळे येथील तापमान नेहमीच सामान्यापेक्षा कमी असते. येथील निसर्गसौंदर्य आणि थंड वातावरणामुळे याला विदर्भाचे काश्मीर म्हणतात. मात्र मार्ग नसल्याने येथे पोहचणे सोपे नाही. महामार्ग झाला तरच हे शक्य आहे. हा महामार्ग छत्तीसगडमधील अबूझमाड क्षेत्रातून जाणार आहे. यामुळे हा प्रकल्प फारच महत्त्वाचा ठरणार आहे.
...
चारपदरी मार्गासाठी परवानगी नाही
या प्रकल्पातील संपूर्ण मार्ग जंगलातून जात असल्याने केंद्रीय वन कायद्याचा अडथळा आहे. प्रस्तावाला परवानगी देण्यासाठी वनविभाग टाळाटाळ करीत आहे. आलापल्ली ते भामरागड दरम्यानचा मार्ग वनविभागाच्या परवानगीनंतरच झाला. तोसुद्धा फक्त ५.५ मीटर आहे. यातही ताडगाव ते हेमलकसा दरम्यान रस्ता बांधकामासाठी वनविभागाने परवानगी न दिल्याने हा मार्ग फक्त ३.५ मीटरचाच करावा लागला. प्रकल्पानुसार हा फोरलेन मार्ग करायचा आहे, परवानगी मिळाली तरच हे शक्य आहे.
...
३३ किलोमीटरचा मार्ग बाकी
यात पुन्हा ३३ किलोमीटर मार्गाचे बांधकाम बाकी आहे. हा मार्ग घनदाट जंगलातून आणि पहाडांमधून निघणार आहे. या ३३ किलोमीटरपैकी २५ किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात असून उर्वरित ८ किमीचा मार्ग छत्तीसगड राज्याच्या क्षेत्रात आहे.
...
कोट
या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक सर्व्हे आमच्याकडून झाला आहे. वन विभागाच्या परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू आहे. दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे.
- विवेक मिश्रा, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली