नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा यंत्रणांची ताकद होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:08+5:302021-07-11T04:07:08+5:30

फहिम खान नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू ...

National Highways will be the strength of security forces in the anti-Naxal campaign | नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा यंत्रणांची ताकद होणार राष्ट्रीय महामार्ग

नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा यंत्रणांची ताकद होणार राष्ट्रीय महामार्ग

Next

फहिम खान

नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू शकतो. नक्षलविरोधी अभियानाशी निगडित अधिकारी यावर खुलेआम बोलत नाहीत; परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या परिसरात वाहतूक वाढल्यामुळे नक्षलवाद्यांचा या परिसरातील प्रभाव कमी होणार आहे. आजही अबुझमाड परिसरात नक्षलवाद्यांचे एकछत्री राज्य सुरू आहे. अबुझमाड दक्षिण छत्तीसगडच्या बस्तर परिसरातील नारायणपूर जिल्ह्यात आहे.

छत्तीसगडमधील अबुझमाड जगातील सर्वात रहस्यमय स्थानांपैकी एक मानण्यात येते. जवळपास ४४०० वर्ग किलोमीटर परिसरातील अबुझमाडचे जंगल, पर्वत, दाट घाटांमधील अपरिचित २३७ गावांचे भू-सर्वेक्षण कधीच होऊ शकले नाही. मुगलांपासून इंग्रजांपर्यंत हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश येऊ शकले नाही. हजारो वर्षांपासून या रहस्यमय परिसरात सुरक्षा दल, सरकारी मशीन प्रवेश करू शकल्या नाही. छत्तीसगडच्या अबुझमाडला नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. आतापर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड पोलीसच नव्हे तर अर्ध सैनिक दलांनी अबुझमाडबाबत अनेक संयुक्त अभियान राबविले; परंतु आतापर्यंत त्यात अधिक यश मिळाले नाही. मात्र, गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांच्या या गडात अधिक खोलवर जाण्यात यशस्वी झाले आहेत; परंतु मोठ्या घटना घडवून आणल्यानंतर नक्षलवादी अबुझमाडच्या दाट जंगलात आणि रहस्यमय पहाडांमध्ये लपले असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

............

सीमेकडील भागात वाढणार आऊटपोस्ट

अबुझमाड परिसरात सुरक्षा यंत्रणांसोबत नक्षलवाद्यांची चकमक होते; परंतु वेळेवर सुरक्षा यंत्रणांना मदत मिळत नसल्यामुळे अनेकदा अभियानात मोठे नुकसान सहन करावे लागते. परंतु राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अभियानादरम्यान अतिरिक्त मदत पोहोचविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात सध्या गडचिरोली पोलिसांची अखेरची चौकी लाहेरीमध्ये आहे. त्यांनाही महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांची संख्या वाढविण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्येही सीमेकडील भागात नव्या आऊटपोस्ट तयार केल्या जाऊ शकतात.

वाहतूक वाढल्यास तरुणांची दिशाभूल करू शकणार नाहीत नक्षलवादी

‘ज्या परिसरात बाहेरील नागरिकांची मदत पोहोचू शकत नाही, तेथील स्थानिक तरुणांची नक्षलवादी दिशाभूल करतात, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु या भागात वाहतूक वाढल्यास तेथील तरुण बाहेरील जगाशी जोडले जातील. त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास त्यांची दिशाभूल करणे शक्य होणार नाही. या राष्ट्रीय महामार्गाशी हा परिसर बाहेरील जगाशी जोडला गेल्यानंतर नक्षलविरोधी अभियान आणि शासनाच्या लोकोपयोगी योजनांना गती मिळेल.’

-संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली

............

Web Title: National Highways will be the strength of security forces in the anti-Naxal campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.