धक्कादायक, राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूचा हुंड्यासाठी सतत छळ

By योगेश पांडे | Published: April 8, 2023 11:40 AM2023-04-08T11:40:14+5:302023-04-08T11:41:16+5:30

पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

national-level athlete harassed for dowry, case booked against the husband and in-laws | धक्कादायक, राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूचा हुंड्यासाठी सतत छळ

धक्कादायक, राष्ट्रीय पातळीच्या खेळाडूचा हुंड्यासाठी सतत छळ

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या एका महिला खेळाडूचा सासरच्या मंडळींनी पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. घर सोडून दुसरीकडे राहणाऱ्या या महिला खेळाडूने अखेर पोलिस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याअगोदर डॉक्टर, अभियंता, अधिकारीपदावरील महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे दिसून आले होते. मात्र, एक खेळाडूदेखील हुंड्याच्या छळवणुकीच्या प्रकारापासून वाचू शकली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अनेक स्पर्धांमध्ये नाव गाजविलेल्या संबंधित महिला खेळाडूचे सात ते आठ वर्षांअगोदर लग्न झाले. लग्नानंतरची काही वर्षे चांगली गेली व मुलेदेखील झाली. मात्र, त्यानंतर पती व सासूने माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. पतीला व्यवसायासाठी तर सासूला कर्ज फेडण्यासाठी पैसे हवे होते. पती दारू पिऊन घरी यायला लागला व त्याची हिंमत संबंधित महिलेला मारहाण करण्यापर्यंत गेली. मुलांसमोरदेखील नशा करून तो शिवीगाळ करत पत्नीला मारहाण करायला लागला. महिला सरकारी नोकरीत असल्याने तिला कधी- कधी घरी येण्यास उशीर व्हायचा. यावरून पती चारित्र्यावरदेखील संशय घ्यायला लागला. अगदी नोकरीच्या ठिकाणी पाठलाग करणे व महिलेच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करण्याचे प्रतापदेखील त्याने केले.

सुमारे वर्षभरापूर्वी पतीने तिला खूप मारहाण केली व घराबाहेर हाकलून दिले. महिला खेळाडूने तिच्या माहेरी आश्रय घेतला. ती सामान आणण्यासाठी घरी गेली असता तिची सासू, दीर व त्याच्या पत्नीने तिला परत पैशांची मागणी करत मारहाण केली. अखेर महिलेच्या संयमाचा बांध सुटला व तिने गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करत तिच्या पतीसह सासू, दीर व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ज्याच्यावर विश्वास ठेवला, त्यानेच अपमान केला

महिला खेळाडूची पतीशी मैदानावरच ओळख झाली होती व तिने त्याच्यावर स्वतःहून जास्त विश्वास ठेवला. आपली नोकरी सांभाळत ती त्याला व्यवसायात मदत कशी होईल यासाठीदेखील प्रयत्न करत होती. मात्र, नवऱ्याने अगोदर हुंड्यासाठी छळ केला व त्यानंतर चारचौघांत वारंवार अपमान करायला सुरुवात केली. महिलेने याला विरोध केला असता सासरच्या मंडळींचा इगो दुखावला गेला होता. ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले त्यांच्याकडूनच अशी वागणूक मिळाल्यामुळे खेळाडू दुखावली गेली आहे.

Web Title: national-level athlete harassed for dowry, case booked against the husband and in-laws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.