रा.स्व. संघाने घेतला विदर्भातील आमदारांच्या कार्याचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 10:26 PM2023-04-20T22:26:09+5:302023-04-20T22:26:35+5:30
Nagpur News गुरुवारी नागपुरात पार पडलेल्या समन्वय बैठकीत विदर्भातील आमदारांच्या कार्याचा व समन्वयाचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी जनतेशी नाळ जुळवून ठेवत केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.
नागपूर : पुढील वर्ष हे लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे वर्ष राहणार असून त्यादृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपतर्फे आतापासूनच बांधणीवर भर देण्यात येत आहे. गुरुवारी नागपुरात पार पडलेल्या समन्वय बैठकीत विदर्भातील आमदारांच्या कार्याचा व समन्वयाचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी जनतेशी नाळ जुळवून ठेवत केंद्राच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.
अत्रे लेआऊट येथील मेघे समूहाच्या महाविद्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील सर्व आमदार सहभागी झाले होते तर संघाकडून प्रांत संघचालक राम हरकरे, प्रांत कार्यवाह अतुल मोघे, क्षेत्र कार्यकारिणी सदस्य दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते. ही बैठक दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील आमदारांचा आढावा घेण्यात आला तर दुसऱ्या टप्प्यांत पश्चिम विदर्भातील आमदारांशी संवाद साधण्यात आला. आगामी निवडणूक आणि संघटन बांधणी तसेच हिंदुत्वाचा जागर या विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन्ही संघटनांमधील समन्वयावरदेखील मंथन झाले. लोकप्रतिनिधींनी जनतेपर्यंत पोहोचत जास्तीत जास्त प्रमाणात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा फायदा लोकांना फायदा कसा होईल यावर भर देण्याची सूचना यावेळी देण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष म्हणाले, राजकीय चर्चा नाही
संघातर्फे नियमितपणे समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. ही बैठक पूर्वनिर्धारितच होती. मात्र, या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा बावनकुळे यांनी केला. या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या नाही त्या पोहोचविण्याच्या दृष्टीने आम्ही आत्मचिंतन केले. या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ‘घर चलो अभियान’ आम्ही सुरू केले असून जे लोक या योजनांमधून सुटले आहे त्यांच्यापर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्यावर भर असेल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
स्मृतिमंदिराऐवजी महाविद्यालयात बैठक
सर्वसाधारणत: रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र, ही बैठक खासगी महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेशीमबाग येथे संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग सुरू आहे. त्यामुळे तेथे बैठकीची व्यवस्था करणे अडचणीचे झाले असते. त्यामुळे महाविद्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.