नागपुरात २ नोव्हेंबरपासून राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:40 PM2017-11-01T18:40:48+5:302017-11-01T18:55:47+5:30
८२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २ नोव्हेंबरपासून नागपुरात कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात होत आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर: स्टार किदाम्बी श्रीकांत, पी. व्ही. सिंधू , सायना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, एच. एस. प्रणय, अजय जयराम या दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या ८२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन गुरुवार दि. २ नोव्हेंबरपासून कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात होत आहे.
सांघिक तसेच वैयक्तिक प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत आठ कोर्टवर ४०० सामने खेळविले जातील. २९ राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशातील ४५० खेळाडू सात दिवस जेतेपदासाठी झुंज देतील. विजेत्यांना एकूण ६० लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येतील.
महाराष्ट्रत २० वर्षानंतर आणि नागपुरात पहिल्यांदा स्पर्धेचे आयोजन होत असल्याची माहिती महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्व दिग्गज खेळाडू उप उपांत्यपूर्व फेरीपासून हजेरी लावणार असून ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान त्यांचे सामने होतील. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून होणार आहे. आकाशवाणीवरून सामन्यांचे समालोचन देखील होईल. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन होणार असून त्यानंतर सांघिक गटाचे सामने सुरू होतील. सांघिक गटात पाटणा येथे झालेल्या गत स्पर्धेचा विजेता पेट्रोलियम क्रीडा मंडळ (पीएससीबी), उपविजेता एअरपोर्ट अॅथॉरिटी (एएआय) यांच्याशिवाय आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, मणिपूर, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश संघ खेळणार आहेत.
शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वैयक्तिक स्पर्धेचे उद्घाटन आणि सांघिक गटाचे पुरस्कार वितरण होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी एकेरीचा अंतिम सामना खेळविला जाणार असून विजेत्यांना पुरस्कृत करण्यात येईल. यावेळी महाराष्ट्रचे माजी खेळाडू प्रदीप गंधे आणि सी. डी. देवरस यांचा सत्कार करण्यात येईल, असे लखानी यांनी सांगितले.
.
एकेरीत थेट प्रवेशप्राप्त
खेळाडू (उप उपांत्यपूर्व फेरी)
पुरुष: किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणय,बी. साईप्रणीत, समीर वर्मा,अजय जयराम, सौरभ वर्मा, पारुपल्ली कश्यप आणि डॅनियल फरीद.
महिला: पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्णा दास आणि अनुरा प्रभुदेसाई.
पुरुष दुहेरी : सात्त्विक साईराज जंकीरेड्डी- चिराग शेट्टी, मनू अत्री-बी. सुमित रेड्डी, एम. आर. अर्जुन-श्लोक रामचंद्रन.
महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी, संजना संतोष- आरती सारा सुनील, जे. मेघना- एस. रामपूर्विशा.
मिश्र दुहेरी: प्रणय जेरी चोप्रा- एन. सिक्कीरेड्डी, बी. सुमित रेड्डी- अश्विनी पोनप्पा.
पुरस्कार...
महिला व पुरुष एकेरी: (उप उपांत्यपूर्व फेरी) ५० हजार, उपांत्यपूर्व फेरी ७५ हजार, उपांत्य एक लाख, उपविजेता एक लाख ५० हजार. विजेता २ लाख. पुरुष व महिला दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी ७५ हजार, उपांत्य १ लाख, उपविजेता १ . ५० लाख, विजेता २ लाख.
सांघिक: उपांत्य एक लाख, उपविजेता तीन लाख आणि विजेता पाच लाख.