राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:46 AM2019-08-29T10:46:30+5:302019-08-29T10:48:14+5:30

आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे.

National Sports Day; 'This' runner needs financial support | राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ

राष्ट्रीय क्रीडा दिवस; 'या' मूकबधिर धावपटूला हवे आर्थिक पाठबळ

Next
ठळक मुद्दे वेगवान शर्यतींसह सायकलिंग, जलतरणातही अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘तिला बोलता येत नाही. ऐकायलाही येत नाही, मात्र खेळात कुठेही कमी नाही. वेगवान धावपटू म्हणून नावारूपास येत असलेली ही कन्या लांबपल्ल्याची शर्यतही सर करते. शिवाय सायकलिंग आणि जलतरण या खेळातही स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविला. यंदा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णाची मानकरी ठरलेल्या या धावपटूचे नाव निधी विनोद तरारे.
शंकरनगरच्या मूकबधिर विद्यालयात दहाव्या वर्गात शिकणाऱ्या निधीचे अख्खे कुटुंब खेळात आहे. वडील विनोद आणि आई संगीता व्हॉलिबॉलपटू असल्याने मोठ्या मुलाला त्यांनी व्हॉलिबॉलचे धडे दिले. तो सध्या औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून पुढे आला आहे. धाकटी निधी जन्मापासून बोलत नाही. सर्व उपाय करून थकल्यानंतर वडिलांनी तिला मैदानावर पाठविण्याचा निर्णय घेतला. या मुलीने सर्वसाधारण धावपटूंसोबत अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलाच; शिवाय बधिरांच्या राष्ट्रीय स्पर्धेत ८०० आणि १५०० मीटर शर्यतीत विक्रमी वेळेसह सुवर्ण पदकांचा मान मिळविला. पचमढी येथे झालेल्या २१ किमी शर्यतीत ती उपविजेती होती. सायकलिंगमधये ४० किमी अंतर सहज पार करते. संभाजी भोसले यांच्या मार्गदर्शनात पट्टीची जलतरणपटू म्हणून पुढे आली. डेकथलॉनमध्ये तिने नाव कमविले आहे.
जय अ‍ॅथ्लेटिक्स क्लबचे कोच सुनील कापगते आणि मूकबधिर शाळेच्या प्रमुख कमल वाघमारे हे निधीवर मेहनत घेतात. वडील खासगी काम करून निधीसाठी वेळ देतात. निधीला आहार म्हणून दूध, बदाम, कडधान्य, अंडी आणि फळे या गोष्टींची ज़ुळवाजुळव करताना फार ओढाताण होते असे सांगून तिचे वडील म्हणाले,‘जमेल तितके आम्ही करतो. तिच्या पायात बळ आहे, पण आहाराच्या कमतरतेमुळे वयाच्या १८ व्या वर्षी तिचा वेग मंदावू नये, याचीही चिंता आहे. आहारासाठी समाजाचे पाठबळ लाभले तर माझी मुलगी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये नाव कमवेल,असा विश्वास आहे. निधीसारख्या अनेक गरजू खेळाडूंना समाजाने दातृत्वाचा हात दिल्यास हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळी गाठू शकतात.’
कोच सुनील कापगते यांनीही निधीच्या क्षमतेचा गौरव करीत बोलता आणि ऐकता येत नसले तरी ही मुलगी जेव्हा धावण्याआधी लेनमध्ये उभी राहते तेव्हा इतरांच्या हालचाली पाहून वेग घेते. बघता बघता ती पुढेही निघून जाते. तिच्या करियरला उभारी देण्यासाठी मदतीचा हात हवा आहे. निधी खेळासोबतच अभ्यासातही हुशार असल्याचे सांगितले.

Web Title: National Sports Day; 'This' runner needs financial support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.