राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव : दमक्षेच्या नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 08:35 PM2019-12-30T20:35:37+5:302019-12-30T20:41:30+5:30
छत्तीसगढ येथील रायपूरमध्ये २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवा’त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दोन नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्तीसगढ येथील रायपूरमध्ये २७ ते २९ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय ‘राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवा’त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीने पाठविण्यात आलेल्या दोन नृत्य समूहांना छत्तीसगढ राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या महोत्सवात आदिवासी संस्कृती, रिती-रिवाज आणि परंपरांना प्रदर्शित करण्यात आलेल्या नागपूरकरांच्या नृत्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. दमक्षेतर्फे या महोत्सवात नागपुरातून दोन नृत्य समूहांना सहभागी करण्यात आले होते. त्यात गोविंद गहलोत यांच्या चमूने मध्यप्रदेशातील भिल जनजातीचे भगोरिया नृत्य सादर केले. या नृत्याला छत्तीसगढ शासनातर्फे २५ हजार रुपयाचे प्रोत्साहन बक्षीस प्राप्त झाले तर राजन वैद्य यांच्या चमूने सादर केलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताराप नृत्याला तीन लाख रुपयाचे द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महोत्सवात देशातील २५ राज्य व केंद्रशासित प्रदेशातील नृत्यचमूंसोबतच सहा देशातील नृत्यचमूंचा सहभाग होता. जवळपास १३५० कलावंतांनी या महोत्सवात आपली कलाप्रतिभा सादर केली. नागपूरच्या कलावंतांनी मिळविलेल्या या यशाबद्दल दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर व कार्यक्रम अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी यांनी अभिनंदन केले.