राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन; नागपूरकरांमध्ये रक्तदानाविषयी उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 10:45 AM2019-10-01T10:45:30+5:302019-10-01T10:48:35+5:30
२५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात महिन्याकाठी केवळ ०.४८ टक्केच रक्तदान होते. भारताचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या केवळ वर्षाला ‘०.९’ टक्के रक्तदान होते.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वात पवित्र दान म्हणून रक्तदानाकडे पाहिले जाते. रुग्णाचा जीव वाचवण्यात रक्तदात्याची भूमिका महत्त्वाची ठरते. परंतु २५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात महिन्याकाठी केवळ ०.४८ टक्केच रक्तदान होते. भारताचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या केवळ वर्षाला ‘०.९’ टक्के रक्तदान होते. विकसित देशात रक्तदान करण्याचे हेच प्रमाण ४ टक्क्यांपर्यंत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) एक टक्का नागरिकांनी रक्तदान केले तरी सर्व रु ग्णांची गरज भागू शकते. मात्र, हे समीकरण नागपूरकरालाही लागू होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी ‘इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रॉसफ्युजन अॅण्ड इम्युनोहॅमेटोलॉजी’द्वारे १ ऑक्टोबर १९७५ पासून राष्ट्रीय रक्तदाता दिवस साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर रक्तदानासंबंधाची जागृती व्हावी म्हणूनही हा दिवस पाळला जातोे. नागपुरात चार शासकीय रक्तपेढीसह पाच खासगी रक्तपेढ्या आहेत. अपघात, बाळंतपण, डायलेसिसचे रुग्ण, एचआयव्हीबाधित, टी.बी., कर्करोग, सिकलसेल व थॅलेसेमिया आजारांच्या रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज पडते. साधारण रोज एक हजार रक्त पिशव्यांची गरज असते. एक पिशवी रक्त दिल्याने तब्बल तीन लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. लाल पेशी, ‘प्लेटलेट्स’, ‘प्लाझ्मा’ अशा तीन घटकांना वेगळे करता येते. त्यामुळे रक्तदान केल्याने कित्येक लोकांचे जीवन वाचविणे शक्य आहे. मात्र महिन्याकाठी केवळ १२ हजार रक्तदाते स्वेच्छेने रक्तदान करतात. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ०.४८ टक्के आहे. रक्ताची गरज भागविण्यासाठी किमान महिन्याकाठी २५ हजार रक्तदात्यांची आवश्यकता आहे.
६५०० रक्तपिशव्यांपैकी १०० रक्त पिशव्या दूषित
भारतामध्ये संकलित केलेल्या ६५०० रक्तपिशव्यांपैकी १०० रक्त पिशव्या या दूषित असतात. दूषित रक्त तपासण्यासाठी ‘न्युक्लिक अॅसिड टेस्ट’ म्हणजे ‘नॅट’ रक्ततपासणी करून घ्यावी लागते. त्यातही तीन प्रकार प्रकार आहेत. त्यापैकी ‘आयडी नॅट’ म्हणजे ‘इन्डिव्हीज्युअल डोनर नॅट‘द्वारे सर्वाधिक शुद्ध रक्ताची सर्वाधिक शाश्वती मिळते. इतर तपासणी तंत्राद्वारे शुद्ध रक्त मिळण्याची शक्यता कमी असते.
-डॉ. हरीश वरभे, उपाध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रॉसफ्यूजन अॅण्ड इम्युनोहॅमेटोलॉजी, महाराष्ट्र शाखा
पुणे-मुंबईच्या तुलनेत नागपुरात स्वेच्छा रक्तदान कमी
दानात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. त्याचे आंतरिक समाधान जगातील मोठ्यातमोठ्या ऐश्वर्यापेक्षा जास्त मोलाचे असते, हे माहीत असतानाही अनेक लोक भ्रामक कल्पनेतून रक्तदान करीत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये स्वेच्छा रक्तदान करण्याचे प्रमाण वाढले असले तरी पुणे-मुंबईच्या तुलनेत नागपुरात स्वेच्छा रक्तदान करण्याचे प्रमाण कमी आहे.
-डॉ. संजय पराते, विभागप्रमुख, आदर्श रक्तपेढी, मेडिकल
रक्तातून २२३४ जणांना एचआयव्ही बाधा
एकीकडे स्वेच्छेने रक्तदान करण्याची संख्या कमी आहे तर दुसरीकडे दूषित रक्तामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाणही मोठे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ८ ऑगस्ट २०१६ रोजी राज्यसभेत सादर केलेल्या अहवालानुसार १६ महिन्यात २२३४ रुग्णांना अशुद्ध रक्त स्वीकारल्याने एचआयव्हीची बाधा झाली, तर गेल्या सात वर्षांत रक्तातील संक्रमणाने १४,४७४ जणांना विविध आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती धक्कादायक आहे. एकदा रक्तातून संक्रमण झाले की वेळ हातून गेली असते. त्या अनुषंगाने सर्वांना सुरक्षित आणि शुद्ध रक्त मिळावे, यासाठी जागृती आवश्यक आहे, असे मत डॉ. हरीश वरभे यांनी व्यक्त केले.