निकोपतेसाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिक

By admin | Published: August 28, 2014 02:01 AM2014-08-28T02:01:12+5:302014-08-28T02:01:12+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार ग्रामीण व नागरी जीवन पातळीवर किती महत्त्वाचा आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. आजची मूल्यव्यवस्था, महानगरीय व्यवस्था

Nationalist thought of universal | निकोपतेसाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिक

निकोपतेसाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिक

Next

राजन गवस : ‘ राष्ट्रसंत : पुरोगामी साहित्यप्रवाहांचा प्रेरणास्रोत विषयावर चर्चासत्र’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार ग्रामीण व नागरी जीवन पातळीवर किती महत्त्वाचा आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. आजची मूल्यव्यवस्था, महानगरीय व्यवस्था आणि ग्रामीण जीवनातील शैक्षणिक वातावरण यासंदर्भात राष्ट्रसंतांच्या साहित्याचा विचार केला तर अनेक प्रश्नांची उत्तरे सहजपणे मिळतात. त्यांच्या साहित्याचा विचार केला नाही तर ग्रामीण जनतेचा कडेलोट होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम काही स्वरूपात दिसायलाही लागले आहेत. सामाजिक निकोपता अखंड ठेवण्यासाठी राष्ट्रसंतांचा विचार सार्वत्रिकच आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन आज बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे करण्यात आले. याप्रसंगी चर्चासत्राचे उद्घाटन करताना बीज भाषणात डॉ. गवस बोलत होते. या चर्चासत्राचा विषय ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : पुरोगामी साहित्यप्रवाहांचा प्रेरणास्रोत’ असा होता. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यासनाचे कार्यकारी प्रमुख डॉ. अक्षयकुमार काळे, डॉ. बोरकर, स्नातकोत्तर मराठी विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. डॉ. गवस म्हणाले, आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत पण राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुसरण केले नाही तर भविष्यात लवकरच आय. टी, अभियंते, डॉक्टर्स आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या आत्महत्याही वाढतील. सध्याही अशा घटना आपण अनुभवतोच आहे. बिघडत चाललेले शैक्षणिक वातावरण त्याला कारणीभूत आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराचे अनुसरण केले तरच उद्याच्या आत्महत्या थांबतील. राष्ट्रीय पातळीवर ग्रामविकासाची जी धोरणे आखली जात आहेत, त्याची संहिताच राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिली आहे, असे ते म्हणाले.
डॉ. देशपांडे म्हणाले, व्यवस्थापन आणि व्यवसाय शास्त्र, अर्थशास्त्रातील ग्रंथापेक्षा कितीतरी सजग विचार राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत मांडला आहे. ग्रामजीवनाचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी दिला. पण आपल्याच संतांकडे दुर्दैवाने आपले दुर्लक्ष होते आहे, असे ते म्हणाले.
गिरीश गांधी म्हणाले, समाजातल्या तळागाळापर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचविण्याचे कार्य प्राध्यापकांनी हाती घ्यावे. विद्यार्थ्यांवर त्यांच्या विचारांचा संस्कार झाल्याशिवाय नवी पिढी तयार होणार नाही. हे काम प्राध्यापकच करू शकतात. आता केवळ विचारांची गरज नाही तर विचारांवर प्रात्यक्षिक करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे ते म्हणाले.
डॉ. अक्षय काळे प्रास्ताविकात म्हणाले, राष्ट्रसंत पुरोगामी विचारांचा प्रेरणास्रोत आहे. यासंदर्भात अर्वाचीन कवींच्या सामाजिक विचारांची पार्श्वभूमी स्पष्ट करीत त्यांनी राष्ट्रसंताचा विचार किती खोल आणि आजच्या काळाला सुसंगत आहे, हे पटवून दिले. राष्ट्रसंत समाजातल्या प्रत्येक माणसाशी एकरूप झाले होते.
केवळ ग्रामीण भागाचाच नाही एकूणच समाजाचा त्यांनी केलेला विचार आजही आम्हाला प्रेरणा देणारा आणि कार्य करायला उद्युक्त करणारा आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी तर आभार डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी मानले.
(प्रतिनिधी)

Web Title: Nationalist thought of universal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.