कामगार कायद्यातील बदलाविरोधात आज देशव्यापी निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 01:26 AM2020-07-03T01:26:37+5:302020-07-03T01:28:17+5:30
विविध राज्यांसह केंद्र शासनातर्फे कामगार कायद्यात होत असलेल्या बदलांबाबत कामगारांमध्ये असंतोष असून कामगार संघटनांनी याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यानिमित्ताने ३ जुलै रोजी देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध राज्यांसह केंद्र शासनातर्फे कामगार कायद्यात होत असलेल्या बदलांबाबत कामगारांमध्ये असंतोष असून कामगार संघटनांनी याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यानिमित्ताने ३ जुलै रोजी देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे.
देशभरातील कामगार संघटना सरकारच्या या धोरणाविरोधात एकवटल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात लाखो श्रमिकांचा रोजगार गेला. अनेकांचे वेतन थांबले. अशात कोरोनाशी लढण्याचे आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे कारण पुढे करीत काही राज्य शासनाने कामगार कायद्यामधील तरतुदींना तीन वर्षांची स्थगिती दिली आहे. म्हणजे या काळात उद्योजक, कंपनी मालकांना कामगार हिताच्या तरतुदी बंधनकारक नसतील. देशात सर्वात आधी उत्तर प्रदेश सरकारने याबाबत निर्णय घेतला. योगी आदित्यनाथ सरकारने कायद्यातील चार तरतुदी वगळता इतर सर्व तरतुदींच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य प्रदेश शासनाने कामगार करार कायदा थेट एक हजार दिवसांसाठी रद्द केला. याशिवाय १० पेक्षा जास्त राज्यांनी कामाची वेळ ८ तासावरून १२ तास केली आहे. कायद्यात बदल करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, ओडिशा आदी राज्यांचाही समावेश आहे. आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना सांगितले, केंद्र शासनाने ४४ कामगार कायद्याचे चार कोडमध्ये रूपांतर करीत असून सर्वच क्षेत्रात खासगीकरणाचे धोरण अवलंबिले आहे. याविरोधात कामगार संघटनांनी एकत्रित लढा पुकारला असून हे कायदे बदल मागे घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा संघटनांनी दिला आहे.
आंदोलनात सहभागी संघटना
शुक्रवारी होणाऱ्या निषेध आंदोलनात इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक), हिंद मजदूर सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू), आॅल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर, ट्रेड युनियन को-ऑर्डिनेशन सेंटर,ऑल इंडिया सेंटर कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन, सेल्फ एम्प्लॉईड वूमेन्स असोसिएशन, लेबर प्रोग्रेसीव्ह फेडरेशन आदी संघटनांचा सहभाग आहे.
संविधान चौकात आंदोलन
शुक्रवारी संविधान चौक येथे सकाळी ११ वाजतापासून निषेध आंदोलन सुरू होणार आहे. आयटकसह सर्व संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती श्याम काळे यांनी दिली.