साडेसहा लाख गावांत नैसर्गिक रंगाचे कारखाने सुरू व्हावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 10:50 AM2021-07-07T10:50:43+5:302021-07-07T10:51:43+5:30
Nagpur News ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलायची असेल तर साडेसहा लाख गावांमध्ये अशा प्रकारचा रंग तयार करणारे कारखाने सुरू झाले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे गायीच्या शेणापासून खादी नैसर्गिक रंग तयार करण्यात येतो आहे. देशातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलायची असेल तर साडेसहा लाख गावांमध्ये अशा प्रकारचा रंग तयार करणारे कारखाने सुरू झाले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नैसर्गिक रंगाच्या कारखान्याचे गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आत्मनिर्भर भारत ही संकल्पना साकार करण्यासाठी कृषी, आदिवासी, ग्रामीण आणि मागासाचा शाश्वत विकास आवश्यक आहे. खादी नैसर्गिक रंगाचा कारखाना सुरू करणारे हे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे गावे समृध्द, संपन्न होतील. गायीचे संरक्षण होईल व अशा स्थितीत कुणीही गाय विकणार नाही. या प्रकल्पाच्या प्रयोगाने नवीन सामाजिक आणि आर्थिक चिंतन दिले आहे. केवळ एक कारखाना सुरू होऊन चालणार नाही, तर पारदर्शक, सोपी पध्दत, परिणामकारक आणि वेळेत निर्णय घेणारी पध्दत हा प्रकल्प नव्याने सुरू करण्यासाठी असावी. या प्रकल्पामुळे ग्रामीण तंत्रज्ञान अधिक मजबूत होणार आहे. एक गाय, एक कडुलिंबाचे झाड आणि एक परिवार, या अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे पाऊल आहे, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.