नैसर्गिक शेती ‘समृद्घ’ शेतकरी!
By admin | Published: May 2, 2017 01:45 AM2017-05-02T01:45:34+5:302017-05-02T01:45:34+5:30
मागील काही वर्षांत रासायनिक खते आणि विषारी औषधांच्या वापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे.
विषमुक्त अन्न : प्रगतशील शेतकऱ्यांचा विश्वास
नागपूर : मागील काही वर्षांत रासायनिक खते आणि विषारी औषधांच्या वापराने जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून, शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे; शिवाय त्या मोबदल्यात समाजाला विषयुक्त अन्नधान्य मिळत आहे. परिणामी गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यातूनच अलीकडे ‘नैसर्गिक शेती’ची चळवळ जोर पकडू लागली आहे.
‘झिरो बजेट’वर आधारित या शेती पद्घतीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होऊ लागला आहे. एकीकडे विदर्भातील शेतकरी हा आत्महत्या करीत असताना नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा ‘समृद्घी’चा मार्ग सापडला असल्याचा विश्वास जिल्ह्यातील नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग राबविणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ व्यासपीठाच्या मंचावर व्यक्त केला.
या चर्चेत प्रगतशील शेतकरी वीरेंद्र बरबटे, कृषी अधिकारी तथा नैसर्गिक शेती तज्ज्ञ हेमंत चव्हाण, समीर जिचकार, संजय श्रीखंडे, अविनाश गुल्हाने, विकास येळणे, महेश मस्के व नरेंद्र येळणे यांनी भाग घेतला होता.
गत काही वर्षांत ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या नेतृत्वात देशभरात ‘नैसर्गिक शेती’ची चळवळ उभी राहात आहे. याच चळवळीचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ‘नैसर्गिक शेती’चा प्रयोग सुरू केला आहे. आज शेतीतील उत्पादकता वाढत असल्याचे दिसून येत असले तरी रासायनिक खते व विषारी औषधांमुळे जमिनी नापीक होत आहेत; शिवाय प्रत्येकाच्या ताटातील अन्न विषयुक्त झाले आहे. मात्र या ‘नैसर्गिक शेती’च्या प्रयोगातील ‘जीवामृत’ त्या जमिनीचे आरोग्य पुन्हा सुधारून समाजाला ‘विषमुक्त’अन्नधान्य मिळत असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
‘जीवामृत’ हे शेतीसाठी ‘अमृता’चे काम करते. त्याच्या वापराने जमिनीत गांडूळ तयार होते. ते गांडूळ १० ते १५ फुटापर्यंतची जमीन भुसभुशीत करते. यामुळे पावसाळ्यातील पाणी शेतीत मुरते आणि शेतकऱ्याला भरघोस पीक मिळण्यास मदत होते. पावसाच्या लहरीपणामुळे पीक बुडाले असे होत नाही. त्यामुळे अशा या नैसर्गिक शेतीतून केवळ शेतकरीच समृद्ध होत नाही तर जमिनीचे आरोग्य सुधारते, पर्यावरण संरक्षण होते आणि भावी पिढीही सुरक्षित राहते, असेही शेतकरी म्हणाले. (प्रतिनिधी)
विषयुक्त अन्न ठरले कॅन्सरचे कारण
काटोल शेजारच्या पारडी देशमुख येथील सुक्षिशित शेतकरी संजय श्रीखंडे म्हणाले, मागील तीन वर्षापूर्वी २०१४ मध्ये त्यांच्या वडिलांचा कॅ न्सरमुळे मृत्यू झाला. त्यानंतर वडिलांच्या कॅ न्सरमागील कारणांचा शोध घेतला असता, त्यापैकी विषयुक्त अन्न एक प्रमुख कारण पुढे आले. यानंतर एक सामाजिक बांधिलकी म्हणून रासायनिक शेती न करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापुढे आपणही विषयुक्त अन्न खायचे नाही, आणि दुसऱ्यांनाही ते पिकवून चारायचे नाही. असा निश्चिय केला असल्याचे यावेळी ते म्हणाले. नैसर्गिक शेती करताना सुरुवातीचे काही दिवस त्रास झाला, मात्र मनात ठाम निर्णय घेतल्याने पुढे सर्वकाही सुरळीत झाले. विषमुक्त अन्नधान्याला प्रचंड मागणी आहे. शिवाय त्याला रासायनिक धान्याच्या तुलनेत भावही चांगला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक शेती आणि अधिक उत्पन्नाच्या मोहात न पडता नैसर्गिक शेती करावी, असे त्यांनी आवाहन केले.
‘नागपूर नॅचरल’चा प्रयोग
नैसर्गिक शेती चळवळीच्या माध्यमातून एकजूट झालेल्या जिल्ह्यातील या प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकविलेले विषमुक्त अन्नधान्य आणि भाजीपाला नागपूरकरांपर्यंत पोहोचावा, या हेतूने मागील दोन वर्षांपूर्वी रामदासपेठ परिसरात ‘नागपूर नॅचरल’ नावाने भाजीपाला व अन्नधान्य विक्रीचे दुकान सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या या प्रयोगाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, येथे ग्राहकांना वर्षभर एकाच दरात विषमुक्त भाजीपाला मिळतो, शिवाय शेतकऱ्यांनाही वर्षभर हमीभाव मिळतो. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून प्रत्येक भाजीपाला हा २० रूपये प्रति किलोप्रमाणे खरेदी केला जातो; शिवाय ग्राहकांना तो ४० रुपये प्रति किलोने विकला जातो. यात मग खुल्या बाजारातील भाजीपाल्याचे भाव कितीही कमी-जास्त असले तरी त्याचा फटका शेतकरी तसेच ग्राहकांना बसत नाही. नागपूरकरांचा या दुकानाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या शेतकऱ्यांनी आता आमदार निवासात दुसरे दुकान सुरू केले जात असल्याची माहिती यावेळी हेमंत चव्हाण यांनी दिली.
विषमुक्त मालाला मनाप्रमाणे भाव
सध्या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतीमालाचा भाव ठरविण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अनेकदा त्याला उत्पन्न खर्चापेक्षा कमी किमतीत तो माल विकावा लागतो. मात्र नैसर्गिक किंवा सेंद्रीय शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाचे भाव शेतकरी हा स्वत: ठरवितो. त्याला पटेल त्याच भावात तो ते विक्री करतो. त्यांच्या विषमुक्त मालाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ते रासायनिक मालाच्या तुलनेत अधिक भावात आपल्या मालाची विक्री करतात. ग्राहकांना सुद्धा शुद्ध आणि विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य मिळत असल्याने तेही अधिक किमत मोजतात. हा शेतकरी आणि नैसर्गिक शेती चळवळीचा फार मोठा विजय मानला जात आहे. शिवाय यातून भविष्यात शेतकऱ्यांना नैसर्गिक व सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून चांगले दिवस येतील, असे संकेत मिळत आहे.
३ ते ५ मेदरम्यान पाळेकरांचे निवासी प्रशिक्षण
पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे येत्या ३ ते ५ मेदरम्यान नागपुरात ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ या विषयावर शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सिव्हिल लाईन्समधील वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या रांगा लागत असून, आतापर्यंत सुमारे एक हजार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली असल्याचे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. या तीन दिवसीय शिबिरात सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’चे संपूर्ण तंत्र आणि मंत्र शेतकऱ्यांसमोर उलगडणार आहेत. यात नैसर्गिक शेती कशी करावी, का करावी आणि त्याचे फायदे काय? या सर्व गोष्टींची ते उकल करणार आहेत.
विषमुक्त भरघोस उत्पादन
यावेळी मौदा तालुक्यातील चाचेर येथील शेतकरी वीरेंद्र बरबटे म्हणाले, ते मागील १४ वर्षापासून ‘नैसर्गिक शेती’ चळवळीत काम करीत आहे. त्यापूर्वी ते स्वत: रासायनिक शेती करीत होते. मात्र मागील १४ वर्षांपासून त्यांनी रासायनिक शेतीला पूर्णविराम दिला. सुरुवातीला ‘एक गाय आणि ३० एकर शेती’ या ‘झिरो बजेट’ शेतीच्या तंत्रावर विश्वास बसत नव्हता. मात्र जेव्हा त्याचा प्रत्यक्ष प्रयोग सुरू केला, तेव्हा त्याचे महत्त्व पटले. मागील काही वर्षांपासून १६ एकर शेती ही केवळ नैसर्गिक पद्घतीने करू न त्यात विषमुक्त भरघोस पीक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी प्रति एकर १९.५ क्विंटलप्रमाणे देशी चिन्नोर धानाचे उत्पादन घेतले असल्याचेही ते म्हणाले. त्यांचा सर्व माल हा विषमुक्त असल्याने त्याला इतर शेतकऱ्यांच्या मालाच्या तुलनेत भावही अधिक मिळतो. शिवाय लोकांची मागणीपण अधिक असते.