नागपुरात घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही येत आहे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:59 AM2020-08-18T10:59:13+5:302020-08-18T11:01:22+5:30
मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दहशतीत रोजच्या रुग्णसंख्येचे उच्चांक गाठले जात आहे. यामुळे कोण, कुणाच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह येईल, याचा नेम राहिला नाही. विशेष म्हणजे, घरी नैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेहही पॉझिटिव्ह येत आहे. मेयो, मेडिकलमध्ये आतापर्यंत असे ६४ मृतदेह पॉझिटिव्ह आले आहेत. तर, गळफास लावून मृत्यू झालेले पाच, पाण्यात बुडून मृत्यू झालेले चार, अपघातात मृत्यू झालेले दोन, खून व विष प्राशन करून मृत्यू झालेले प्रत्येकी दोन असे एकूण १३ मृतदेह कोरोनाबाधित होते.
संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकेतून किंवा बोलताना तोंडातून बाहेर पडणाऱ्या तुषारांमधून (ड्रॉपलेट्स) कोरोनाची प्रामुख्याने बाधा होते. मात्र, हा विषाणू पृष्ठभागांवर अनेक दिवसही सक्रिय राहू शकतो. मृतदेहाकडून लागण होण्याची शक्यता कमी असली तरी धोका कायम असतो. रुग्णालयाच्या एका पाहणीत असे आढळून आले की, ८ तासानंतर मृतदेहाचे तपासलेले नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे योग्य पद्धतीने कोविड पॉझिटिव्ह मृतदेह हाताळणे व अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे.
नागपूर जिल्ह्यात पहिल्या कोविड पॉझिटिव्ह मृतदेहाची नोंद ५ एप्रिल रोजी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) न्यायवैद्यकशास्त्र विभागात झाली. तेव्हापासून मेयो, मेडिकलच्या या विभागाकडे संशयित मृतदेहाच्या तपासणीचा भार वाढला आहे. सध्या मेयोमध्ये रोज १५ ते २० तर मेडिकलमध्ये ३० ते ४० मृतदेह येत आहेत. या सर्वांची नियमानुसार कोविड तपासणी केली जात आहे.
पॉझिटिव्ह अहवाल आल्यास महानगरपालिकेच्या ताब्यात मृतदेह दिला जात आहे.
मेयोमध्ये ५०, मेडिकलमध्ये २६ मृतदेह पॉझिटिव्ह
उपलब्ध माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात साधारण ६३० मृतदेह शवविच्छदनाला आले. या सर्वांची कोविड तपासणी केली असता ५० मृतदेह पॉझिटिव्ह आले. यातील चार गळफास, दोन पाण्यात बुडालेले, तर दोन रस्ता अपघातातील होते. मेडिकलच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागात गेल्या महिनाभरात २७ मृतदेह पॉझिटिव्ह आले. यात २२ नैसर्गिक मृत्यू, पाण्यात बुडालेले दोन, गळफास लावलेला एक, विष प्राशन केलेला व एक खून झालेला व्यक्तीचा मृतदेह होता.
श्वसनाच्या आजाराने दगावलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसात आणि इतर अवयवांमध्ये विषाणू असू शकतात. हे विषाणू शवविच्छेदन करताना वापरण्यात येणारी अवजारे किंवा आतला भाग स्वच्छ करताना पसरू शकतात. त्यामुळे ‘कोविड’मुळे दगावलेल्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करताना प्रशिक्षित व्यक्तीकडूनच करण्यात यावे, हे कटाक्षाने पाळले पाहिजे.
-डॉ. मकरंद व्यवहारे, विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, मेयो