निसर्गसौंदर्याने केला घात
By admin | Published: June 26, 2017 01:43 AM2017-06-26T01:43:45+5:302017-06-26T01:43:45+5:30
निसर्गसौंदर्य अन् ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहिणीला भावाने केलेला फोन काश्मिरातून कडेलोट करणारा ठरेल,
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गसौंदर्य अन् ख्यालीखुशाली विचारण्यासाठी बहिणीला भावाने केलेला फोन काश्मिरातून कडेलोट करणारा ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. बहीण किंवा जावई बोलण्याऐवजी भलत्याच व्यक्तीने फोन उचलला अन् गुलमर्ग (जि. बारामुल्ला, काश्मीर) येथे झालेल्या अपघातात तुमची बहीण, जावई अन् दोन्ही भाच्या ठार झाल्याची सुन्न करणारी बातमी सौरभ तसेच राहुल वांढरे या भावंडांना सांगितली. काळजाचे पाणी करणाऱ्या या बातमीने चिटणीसनगरातील वांढरे आणि जुना सुभेदार ले-आऊट मधील अंड्रसकर परिवारावर दु:खाची हिमकडाच कोसळली.
जुना सुभेदार ले-आऊट मधील मूळ निवासी असलेले जयंत नामदेवराव अंड्रसकर (वय ४२) गेल्या सात वर्षांपासून रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीत स्थायिक झाले होते. तेथे डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन म्हणून सेवा देत होते. पत्नी मनिषा (वय ४०) आणि जान्हवी (वय ७) तसेच अनघा (वय ५) या दोन चिमुकल्या असा त्यांचा गोड संसार होता. नागपुरात वडील नामदेवराव, आई विमलताई, मोठा भाऊ सतीश (वय ४५), वहिनी, विवाहित बहीण संगीता श्रीकांत कायरकर आणि त्यांची मुले असे भरलेले हे कुटुंब. सर्व काही सुरळीत. मनिषाचे माहेर चिटणीसनगरातील. त्यांना राहुल आणि सौरभ ही भावंड. या कुटुंबात नुकताच एक लग्नसोहळा झाला. सारे जण जमले.
मोठा आनंदोत्सव साजरा झाला अन् ८ दिवसांपूर्वीच जयंता पत्नी मनिषा तसेच दोन चिमुकल्यांसह टूरवर गेला. काश्मिरातील सौंदर्य बघण्याची हौस होती त्यांना. त्यामुळे शुक्रवारी ते काश्मिरात गेले. जयंता अन् मनिषा दोघेही आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. दिवसभर काय बघितले, काय केले, त्याचा अहवाल ते सायंकाळी आपल्या कुटुंबीयांना ऐकवत होते. मनिषाचा छोटा भाऊ सौरभ याने रविवारी सकाळीच त्यांच्याशी संपर्क केला होता. पुन्हा सायंकाळी ६ च्या सुमारास अपडेट घेण्यासाठी मनिषांच्या मोबाईलवर संपर्क केला. पलिकडून बहीण बोलण्याऐवजी भलत्याच व्यक्तीचा रुक्ष आवाज आला. कोण बोलता, कुठून बोलता, असे विचारणे झाल्यानंतर मनिषा, तिचे पती जयंत अन् दोन्ही मुलींचा गुलमर्ग येथे केबल कारवर झाड आदळल्याने भीषण अपघात झाल्याचे स्वत:ला पोलीस म्हणवून घेणाऱ्याने सांगितले.
हे चौघेही गंभीर जखमी असल्याचे कळाल्याने पुढचे काही ऐकण्याची सौरभची मन:स्थितीच नव्हती. त्यामुळे तो फोन तसाच कटला. पुढच्या काही क्षणानंतर मोठा भाऊ राहुलने पुन्हा मनीषांच्या मोबाईलवर संपर्क केला. यावेळी पलीकडून बोलणाऱ्याने वज्राघातच केला.
या भीषण अपघातात मनीषा, तिचे पती जयंत अन् दोन्ही मुलींचा अंत झाल्याचे कळाल्याने वांढरे परिवार सुन्न झाला.
जयंत यांचे मोठे बंधू सतीश अंड्रसकर यांना कळविण्यात आले. कर्णोपकर्णी ही माहिती जुना सुभेदार लेआऊट परिसरात पोहोचली अन् तीव्र शोककळा निर्माण झाली. अंड्रसकर परिवाराशी संबंधित तसेच शेजाऱ्यांनी त्यांच्या घरासमोर एकच गर्दी केली. काय झाले, कसे झाले ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील होता. या वृत्ताने तरुण मुलगा, सून अन् दोन नाती गमावणाऱ्या विमलताई तसेच नामदेवराव अंड्रसकर दाम्पत्यावर तर दु:खाची कुऱ्हाडच कोसळली. ते अबोल झाले आहेत.
जगप्रसिद्ध केबल कार
गुलमर्ग मधील गोंडोला टॉवर केबल कार जगभरात लोकप्रिय आहे. आशियातील सर्वात लांब समजला जाणारा हा रोप वे उंचीसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची केबल कारसेवा म्हणूनही ओळखला जातो. हा प्रकल्प कोंगदुरी पर्वतावर तब्बल १४ हजार फूट उंचीवर साकारण्यात आला आहे. जगभरातील लाखो पर्यटक येथे हिमवर्षावाचा अन् केबल कारचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी येतात. केबल कारमधून पर्यटकांना पाच किलोमीटरच्या रोमहर्षक प्रवासावर नेण्यात येते. त्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या अंड्रसकर कुटुंबीयांचा हा अखेरचा प्रवास ठरला.
शुक्रवारी येणार होते !
जयंत अंड्रसकर प्रारंभी केडीके कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. तेथून ते नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर सात वर्षांपूर्वी ते डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन म्हणून रुजू झाले. मोठ्या पदावर आणि पगारावर देशाच्या राजधानीत स्थायिक झाले असले तरी नागपुरातील नाळ त्यांनी तुटू दिली नाही. ते दोन-तीन महिन्यानंतर नियमित नागपुरात यायचे अन् मुक्कामी राहायचे. आठ दिवसांपूर्वीच ते नागपुरातून गेले. शुक्रवारी ३० जूनला त्यांच्या सासूबार्इंचे अक्करमास कार्यक्रम असल्याने ते सहपरिवार येथे येणार होते. मात्र, काळाने त्यांच्यावर मध्येच झडप घातली. शुक्रवारीऐवजी सोमवारी उशिरा रात्रीपर्यंत अंड्रसकर कुटुंबीयांचे मृतदेह नागपुरात येणार असल्याचे सौरभ वांढरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.