पेंच, बोर, उमरेडच्या निसर्ग पर्यटनालाही हिरवी झेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:04 PM2020-09-17T17:04:08+5:302020-09-17T17:05:16+5:30
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे. १ ऑक्टोबरपासून येथील वन पर्यटन सुरू होत आहे. मात्र अटी-शर्तीच्या अधीन राहूनच या पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने मर्यादित स्वरूपात आरक्षण केले जाणार आहे. मात्र रस्त्यांच्या उपलब्धतेनुसार हा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी पर्यटन गेटवर बुकिंग करता येइल. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ऑनलाईन पद्धतीने ५० टक्के सफारी आरक्षण करता येणार आहे. कोरोनामुळे बरीच दक्षता घेतली जाणार आहे. सध्याच्या वाहनांच्या एकूण पर्यटन क्षमतेच्या ५० टक्के पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. एक वाहनचालक, एक मार्गदर्शक आणि चार पर्यटक अशा सहा जणांनाच प्रवेश राहणार आहे.
सिलारी येथील पर्यटन संकुलामध्ये निवासासाठी फक्त क्षमतेच्या ३० टक्के परवानगी राहणार आहे. सुरेवानी आणि कोलितमारा येथील पर्यटन संकूल सध्या उपलब्ध नाही. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वतोपरी खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझेशन, गन थर्मामीटरद्वारे शरीराचे तापमान मोजणे आदी बाबींचा यात समावेश आहे. जिप्सीचे टायर बाथ करून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र अतिपाऊस किंवा व्यवस्थापनाच्या दृष्टीने मार्ग बंद करण्याचा अधिकार वन्यजीव विभागाने राखून ठेवला आहे.
अडेगाव गेट बंदच
अतिपावसामुळे बोर व्याघ्र प्रकल्पामधील अडेगाव गेट पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहे. यामुळे अर्थातच येथून पर्यटन करता येणार नाही. सुरेवानी-पवनी या प्रवेशद्वारातून खासगी पर्यटक वाहनांमध्ये फक्त जीपला परवानगी देण्यात आली आहे. बोरधरण व कऱ्हांडला या दोन्ही गेटवर जिप्सी उपलब्ध करून दिली जाणार आहे.