निसर्ग सौंदर्याचा सुखद आस्वाद म्हणजेच कला
By admin | Published: March 13, 2016 03:24 AM2016-03-13T03:24:38+5:302016-03-13T03:24:38+5:30
आपण कृषी क्षेत्रात काम करताना नांगरण, वखरण, बीजोत्पादन या विषयांचा अभ्यास केला पण कृषीक्षेत्र जीवनाच्या रेषांशी संबंधित आहे तर दीनानाथजींच्या रेषा कलेशी संबंधित आहेत.
शरद निंबाळकर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत दीनानाथ पडोळे यांच्या अक्षयरेषा चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर : आपण कृषी क्षेत्रात काम करताना नांगरण, वखरण, बीजोत्पादन या विषयांचा अभ्यास केला पण कृषीक्षेत्र जीवनाच्या रेषांशी संबंधित आहे तर दीनानाथजींच्या रेषा कलेशी संबंधित आहेत. या रेषा जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या आणि जीवनाला समद्ध करणाऱ्या आहेत. कुठल्याही कलेचा आधार आनंद आणि समाधान आहे. निसर्गाच्या सौंदर्याचा सुखद आस्वाद म्हणजेच कला. दीनानाथजींच्या या चित्रातून आणि कलात्मक आकारातून एका सौंदर्याची अनुभूती होते म्हणूनच त्यांच्या चित्रांचे हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे, असे मत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले.
चित्रकार दीनानाथ पडोळे मित्र परिवाराच्यावतीने अक्षयरेषा या चित्र प्रदर्शनाचे आयोजन लोकमत भवन, रामदासपेठ येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत शनिवारपासून करण्यात आले. या प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ पडोळे यांच्या कलाकृती आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून निंबाळकर बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोद्दारेश्वर राम मंदिरचे प्रबंधक विश्वस्त रामकृष्ण पोद्दार, ख्यातनाम चित्रकार प्रमोदबाबू रामटेके आणि चित्रकार दीनानाथ पडोळे उपस्थित होते. निंबाळकर म्हणाले, दीनानाथजींच्या रेषांनी चित्रात ताल धरला आहे, फेर धरला आहे आणि त्या नर्तन करीत आहे. त्यांच्या या नर्तनाचा नाद डोळे ऐकतात. डोळ्यांना आणि मनाला समाधान देणाऱ्या कलाकृती आहेत. रामकृष्ण पोद्दार म्हणाले, पोद्दारेश्वर राम मंदिराच्या निमित्ताने दीनानाथ यांच्याशी गेल्या ४० वर्षांचा संबंध आहे.
अत्यंत चोख आणि प्रामाणिकपणे काम करणारा हा कलावंत आहे. त्यांनी काही वर्षे श्रीराम शोभायात्रेच्या रथाचे केलेले डिझाईन उत्कृष्ट होते. त्यांचे हे चित्रप्रदर्शन पाहतानाही त्यांच्यातल्या कलावंतांची अस्वस्थता रसिकांना एक विचार देणारी आहे. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, प्रदर्शनातले प्रत्येक चित्र एक भावना आहे.
दीनानाथांची पहिली प्रेयसी म्हणजे कलाच आहे पण त्यांचे तिच्याकडे काही काळ दुर्लक्ष झाले. हे प्रदर्शन म्हणजे त्यांची अनुभूती आणि आत्मशोध आहे. त्यांच्याच रुतून असलेली कला त्यांनी बाहेर काढली, हा महत्त्वाचा भाग आहे. श्रेष्ठ दर्जाची कलाकृती निर्माण करणे कठीण असते. प्रत्येक निरीक्षकाला कलेचा अर्थ कळेलच असे नाही त्यासाठीच शालेय जीवनात कलामीमांसा हा विषय असला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाचे संचालन अजेय गंपावार यांनी तर आभार दिनेश चव्हाण यांनी मानले. याप्रसंगी माजी आ. यादवराव देवगडे, रणजितसिंह बघेल, गिरीश पांडव, आभा पांडे, जयप्रकाश गुप्ता, पारळकर, उमेश चौबे, अतुल कोटेचा, चंद्रकांत चन्ने, अनिल इंदाणे, किशोर बानाबाकोडे, संजय पुंड, प्रमोद सूर्यवंशी, जयंत गायकवाड, चेतन जोशी, टेकडी गणेश मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव जवंजाळ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)
संस्कृती आणि कला जपण्याची जबाबदारी समाजाची- खा. विजय दर्डा
सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरणारा माणूस कसा असावा याचा आदर्श म्हणजे दीनानाथ पडोळे आहेत. आपण चित्र निर्माण करत नसतो तर ते घडत असते. चित्रकाराची मानसिकता चित्रातून व्यक्त होते. फार कमी कलावंत राजकारणात आले पण राजकीय क्षेत्राला आणि समाजालाही चांगली माणसे जपता आली नाहीत. खरे तर संस्कृती आणि कला जपण्याची जबाबदारी समाजाची आहे, असे मत खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केले. चित्रकार संवेदनशील असतो. पण दीनानाथजींविषयी मात्र ते पेंटर असल्याचे लोकांना वाटायचे. त्यांचे कलाशिक्षण अनेकांना माहीत नव्हते. एका राजकीय पक्षाने आपल्याला निवडणुकीसाठी तिकीट दिले नाही, अशी खंत पडोळे यांनी व्यक्त केली. यासंदर्भात खा. विजय दर्डा त्यांना उद्देशून म्हणाले, जे लोक तुम्हाला समजू शकले नाही, त्यांना सोडून द्या. आपण कशाला त्रास करून घ्यायचा. राजकारणात यशस्वी होण्यासाठी जात, धर्म आणि पैसा या तीन बाबी प्रथम लागतात. महात्मा गांधी यांनीही आज निवडणूक लढविली तर ते निवडून येऊ शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे निवडणुकीत पडोळे यांचा पराभव झाला असला तरी समाजाला त्यांच्यातील चित्रकाराची गरज आहे. अटलबिहारी वाजपेयी कवी होते. व्ही. पी. सिंग कवी, चित्रकार होेते. या संवेदनशील नेत्यांनाही आम्ही सांभाळून घेण्यात कमी पडलो. पण त्यांचे कलावंतपण मात्र समाज विसरू शकत नाही. भारतात अनेक ताकदीचे कलावंत आहेत पण त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात आम्ही कमी पडतो आहोत. महाकवी कालिदास जागतिक कीर्तीचा कवी आहे पण शेक्सपीअरच्या तुलनेत आम्ही त्याचे महत्त्व वाढवू शकलो नाही. देशाच्या स्वातंत्र्याची लढाई सेवाग्रामहून लढली गेली पण सेवाग्रामला फारसे महत्त्व नाही. सेवाग्रामचे महत्त्व राजघाटला येऊ शकत नाही. बॉम्बे आर्ट सोसायटीसारखी एखादी संस्था नागपुरातही निर्माण होण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.