ही नाट्य परिषद आहे की राजकारणाचा आखाडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:13 AM2021-02-17T04:13:31+5:302021-02-17T04:13:31+5:30

- नियामक मंडळाला डावलून अध्यक्षांची मनमानी ठरतेय मारक - ६० पैकी ३६ जण विरोधात प्रवीण खापरे / लोकमत न्यूज ...

Is this Natya Parishad or the arena of politics? | ही नाट्य परिषद आहे की राजकारणाचा आखाडा?

ही नाट्य परिषद आहे की राजकारणाचा आखाडा?

Next

- नियामक मंडळाला डावलून अध्यक्षांची मनमानी ठरतेय मारक

- ६० पैकी ३६ जण विरोधात

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कारभार नाट्यविकासविषयक धोरणापेक्षा राजकीय आखाड्यातच जास्त रंगला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला गोंधळ अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या विरोधात असलेला असंतोष व्यक्त करत आहे. बहुमताला डावलून आपलाच हेका मिरवित अध्यक्ष राजकीय पायऱ्या झिजवत असून, ही लागेबंदी त्यांना तारण्यापेक्षा असंतोषाला वाट मोकळी करणारी ठरत असल्याचे दिसून येते.

प्रसाद कांबळी यांच्या विरोधात नियामक मंडळातील ६० पैकी ३६ सदस्यांनी नाराजी व्यक्त करत गेल्या दोन-अडीच वर्षात केलेल्या कारभाराचा हिशेब सादर करण्याची मागणी केली होती. तो सादर केला नसल्याने नाराज सदस्यांनी विशेष सभेची मागणी केली होती. त्याअनुषंगाने कार्यवाह शरद पोंक्षे यांच्या मध्यस्थीने १७ फेब्रुवारीपर्यंत सभा घेण्याची मुदत देण्यात आली. मुदत संपत असतानाही सभेची घोषणा झाली नाही, हे बघून नियामक मंडळाने स्वत:च १८ फेब्रुवारी रोजी विशेष सभा बोलावली आहे. मात्र, सभेचा विरोध करत बहुमतालाच कोर्टात खेचण्याचा पराक्रम कांबळी यांनी केला आणि १६ फेब्रुवारी रोजी दोन्ही गटाचा युक्तिवाद ऐकूण कोर्टाने निकालासाठी बुधवारची तारीख राखून ठेवली आहे. विशेष म्हणजे मुदतीच्या काळात अध्यक्षांनी नियामक मंडळाच्या सदस्यांची मनधरणी वा त्यांच्या शंकांचे समाधान करण्याचे प्रयत्न न करता, नाट्य परिषदेचे विश्वस्त व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्याकडे खेटा मारल्या. अध्यक्षांच्या या कुरापात्यांनी नियामक मंडळाचे सदस्य आणखीनपच संतापले आहेत. या प्रकारामुळे जे सदस्य तटस्थ होते, तेही आता कांबळी यांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, कार्यकारिणीतही कांबळी यांच्या या कृत्यांबाबत संपात निर्माण झाल्याचे चिन्हे आहेत. एकूणच कांबळी यांनी स्वत:च अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची स्थिती निर्माण केल्याचे स्पष्ट होत आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवल्यामुळे, या प्रकरणावर कार्यकारिणीतील सदस्य व विरोधकांनी उघड बोलण्यास नकार दिला आहे.

राजकारणामुळे शंभरावे नाट्यसंमेलन बारगळले

कोरोना टाळेबंदी उठताच अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची तारीख निश्चिती व नियोजनही सुरू झाले. मात्र, संबंध मराठी रसिकांच्या नजरा खिळलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाबाबत कुठलीच घोषणा झालेली नाही. नाट्य परिषदेची कार्यकारिणी व नियामक मंडळ सदस्यांच्या गोंधळात नाट्यसंमेलन बारगळल्याचे दिसून येत आहे.

हिटलरशाही करणार घात

नाराज नियामक मंडळ सदस्यांनी प्रसाद कांबळी यांच्याविरोधात सातत्याने नाराजी व्यक्त केली आहे. कार्यकारिणी व नियामक मंडळाला विश्वासात न घेता व बैठकीविनाच निर्णय घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात कलावंतांना केलेली मदत, बॅकस्टेज आर्टीस्टना केलेली मदत आदी अनेक विषय हे नियामक मंडळाच्या चर्चेविनाच त्यांनी मार्गी लावले. त्यामुळे, यात भ्रष्टाचाराचा आरोपही नाराज सदस्यांनी लावत, गेल्या वर्षी कोर्टाचे द्वार ठोठावले होते.

............

Web Title: Is this Natya Parishad or the arena of politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.