३१० पक्ष्यांची नोंद असूनही नवेगाव बांध उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 04:54 PM2020-09-17T16:54:45+5:302020-09-17T16:55:54+5:30

गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे अभयारण्य वैविध्यपूर्ण असल्याचे मानले जाते. विविध वनराईसोबतच येथे असलेले निरनिराळे पक्षी हे येथील वेगळेपण आहे. पक्षी अभयारण्याचा दर्जा नसतानाही येथे ६०० पैकी ३१० पक्ष्यांची नोंद झाली आहे.

Navegaon dam neglected despite registration of 310 birds | ३१० पक्ष्यांची नोंद असूनही नवेगाव बांध उपेक्षित

३१० पक्ष्यांची नोंद असूनही नवेगाव बांध उपेक्षित

Next
ठळक मुद्देवैविध्यपूर्ण जंगल प्रतीक्षा पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळण्याची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध हे अभयारण्य वैविध्यपूर्ण असल्याचे मानले जाते. विविध वनराईसोबतच येथे असलेले निरनिराळे पक्षी हे येथील वेगळेपण आहे. पक्षी अभयारण्याचा दर्जा नसतानाही येथे ६०० पैकी ३१० पक्ष्यांची नोंद झाली आहे. मात्र एवढे असूनही नवेगाव बांध मात्र उपेक्षितच आहे. निसर्गाच्या या अनमोल क्षेत्राला पक्षी अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी आता पुढे येत आहे.

नवेगावमध्ये पक्ष्यांच्या अभ्यासासाठी बराच वाव आहे. अनेक प्रकारचे पक्षी येथे वास्तव्यास असून पक्षी निरीक्षक सलीम अली, मारुती चितमपल्ली यांनी अनेक पक्ष्यांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत. पक्षी निरीक्षणाला आणि पक्ष्यांच्या अभ्यासाला येथे बराच वाव आहे. पक्षी अधिवास, स्थलांतरित पक्षी, त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक पक्षिमित्र उत्सुक असले तरी वनविभाग आणि शासनाकडून त्यासाठी वेगळा दर्जा मिळावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. येथील उत्तम वातावरणात फोटोग्राफी, डॉक्युमेंटेशनला वाव असल्याने हे क्षेत्र पक्षी अभ्यासकांना नेहमीच खुणावत असते.

या तलावात २५-३० वर्षापूर्वी ५ फुटी कासव (चाम), लाखो पाणकावळे व पाणमांजर (हुदाळ्या) आढळत. पण आता नामशेष झाले आहेत. पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी आणि वाढीसाठी उपाययोजनांची गरज आहे. जनप्रतिनिधींनीही अलिकडेच हे क्षेत्र पक्षी अभयारण्य करा, अशी मागणी केली आहे.

नवेगाव बांधचा मागोवा
नवेगाव बांध तलाव हा सर्वात जुना व मोठा तलाव आहे. चिमण पाटील कोहळी यांनी या जलाशयाची निर्मिती केली, असा उल्लेख भंडारा जिल्हा गॅझेटिअरमध्ये असून हे जलाशय १६५० ते १७१५ इ.स. या काळात झाल्याची नोंद आहे. १२ गावे बाहेर काढून व जंगल तोडून हे जलाशय बांधण्यात आले होते, यावरून त्याची व्याप्ती लक्षात येते. तलावाच्या दक्षिणेकडे पर्यटन संकुल क्षेत्र आहे. मात्र अपुऱ्या माहितीमुळे पर्यटक या क्षेत्रालाच राष्ट्रीय उद्यान समजतात. परंतु १९७५ ला घोषित झालेले नवेगाव राष्ट्रीय उद्यान तलावाच्या उत्तरेकडे असून अत्यंत घनदाट व जैवविविधतेने परिपूर्ण आहे.

पक्षी अभयारण्यामुळे येऊ शकते उपजीविकेवर गदा
वन अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत हजारो हेक्टर वनजमीन वाटप होत असताना शेकडो वर्षांपासून असलेले हक्क डावलून पक्षी अभयारण्य घोषित करण्याचा घाट कशासाठी, असा प्रश्न सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी अशोक खुणे यांनी उपस्थित केला आहे. लोकांच्या उपजीविकेवर गदा आणून पक्षी अभयारण्य उभारण्यापेक्षा पक्षी कमी होण्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

नवेगावच्या विकासासाठी एवढे करा
नवेगाव क्षेत्राच्या विकासासाठी स्थानिकांकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यातून रोजगार वाढीसोबतच पर्यटनाला चालना मिळणार असल्याने बेरोजगारीवरही मात करता येणार आहे. त्यासाठी काही अपेक्षा स्थानिकांच्या आहेत. मनोहर उद्यान व सरोवर दर्शन उद्यानाचा नव्याने विकास, पर्यटन विकासासाठी आवश्यक बांधकाम, बेशरम निर्मूलन, पक्षी थांबे, निवासी पक्ष्यांच्या अधिवासाचा अभ्यास करून आवश्यक असलेली वृक्ष लागवड, देवधान लागवड व गुरेचराई नियंत्रण आदीसह इंटरप्रिटेशन सेंटर, वॉच टावर व बॅटरीवर चालणारी मिनिसिटर बस या अपेक्षा आहेत. लोकसहभागही यात महत्त्वाचा ठरणार आहे.

 

Web Title: Navegaon dam neglected despite registration of 310 birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.