नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना, खिंडसी पूरक कालव्यासाठी ठरणार वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:12 AM2021-09-04T04:12:48+5:302021-09-04T04:12:48+5:30
रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून ...
रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून प्रस्तावित नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना व राेहणा उचल याेजना हाती घेतली आहे. या याेजनेची कामे तातडीने व्हावीत यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कन्हान नदीवर काेच्छी गावाजवळ या याेजनेचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण पाणी ४०.४८ दलघमी व वार्षिक पाणीवापर ७५.०६ दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून या बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याचे नियाेजित आहे. बुडित क्षेत्रात पंपहाऊस बांधून ८०० अश्वशक्तीचे ८ पंप लावून पाण्याचा उपसा करून ८ कि.मी. उर्ध्व नलिकेद्वारे (२२४० मि.मी.च्या दाेन रांगा) व नंतर १२ कि.मी. प्रवाही कालव्याद्वारे हे पाणी नवेगाव खैरी जलाशयात व पुढे खिंडसी तलावात येऊ शकते. या याेजनेचा खर्च ३२५ कोटी रुपये इतका आहे. तर राेहणा उचल याेजनेसाठी ३९ कोटींचा खर्च रुपये इतका आहे. याद्वारे नागपूर महानगरपालिका पाणी घेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही याेजना पूर्ण झाल्या तर नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी समस्या सुटू शकते. लाेहघाेगरी-ताेतलाडाेह वळण प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागेल व त्याचा खर्चही ३,६३२ कोटी इतका असल्याने, हे दाेन्ही प्रकल्प पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याही मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. या योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोच्छी बॅरेजवरून पाईपलाईनद्वारे नवेगाव खैरी येथे पाणी आणल्यास चौराई धरणामुळे निर्माण झालेल्या तोतलाडोह धरणातील जलसाठ्यामधील तूट भरून काढण्यासाठी आणि पेंच पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनाखाली असणाऱ्या रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था होईल. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. हा प्रकल्प नागपूर ग्रामीण नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरेल. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तीत रामटेक तालुक्याची बाजू उदयसिंग यादव यांनी मांडली.