राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी आमनेसामने; शनिवारी नागपुरात करणार हनुमान चालिसा पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 10:40 AM2022-05-26T10:40:34+5:302022-05-26T18:41:45+5:30
राणा दाम्पत्य शनिवारी नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. तर, राष्ट्रवादीनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली.
नागपूर : अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा शनिवारी (दि. २८ मे) रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करून महाआरती करणार आहेत. मात्र, त्याच मंदिरात त्याच दिवशी व त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर नागपूर शहर राष्ट्रवादीने अंबाझरी पोलिसांकडे अर्ज करून यासाठी परवानगी मागितली आहे.
युवा स्वाभिमान पार्टीचे अमरावती जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत सांगितले की, राणा दाम्पत्य शनिवारी विमानाने नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. तेथे महाआरती करतील. त्यानंतर ते भाविकांना हनुमान चालिसा पुस्तिकेचे वाटप करणार आहेत. पत्रकार परिषदेला युवा स्वाभिमान पार्टीचे नागपूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर बिसेन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे, वर्धा जिल्हाध्यक्ष वामन जाधव उपस्थित होते.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच मंदिरात याच दिवशी हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली. पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी बुधवारी सकाळी याबाबत अंबाझरी पोलिसांकडे अर्ज केला. पेठे म्हणाले, आम्ही सकाळी अंबाझरी पोलिसांना पत्र दिले तोवर तेथे आरतीसाठी कुणाचेही पत्र आलेले नव्हते. आमच्या पूर्वी जर कुणी पत्र दिले असेल तर त्यांनाही परवानगी द्यावी. देशात अशांती दूर होण्यासाठी आम्ही साकडे घालणार आहोत. कुणाला राजकारण करायचे असेल तर त्यांनी ते करावे, असेही पेठे म्हणाले. तूर्तास पोलिसांनी कुणालाही अधिकृत परवानगी दिलेली नाही.