नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका
By कमलेश वानखेडे | Published: September 30, 2022 05:36 PM2022-09-30T17:36:46+5:302022-09-30T17:37:19+5:30
उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी असल्याची टीका
नागपूर : बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण, असं वागणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कार्यकर्ता आहेत म्हणून आम्ही आहेत, कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडू यांनी ठेवायला हवा, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना राणा यांनी बच्चू कडू यांच्यासह माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नेम साधला. उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरुन ते परिपक्व आहे असे वाटत नाही. ते बाळासाहेबांचे सुपूत्र आहेत असंही वाटत नाही. ५६ वर्षे ते त्यांच्या परिवारात आहे. मात्र त्यांनी १० टक्केही मिळवलं नाही. त्यांनी बाळासाहेबांचे सर्वस्व गमावलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या जमिनीवर राहून संघर्ष करु शकत नाही, अशी खोचक टीका राणा यांनी केली.
धनुष्यबाण शिंदे गटाकडे असेल
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना येवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद असती. त्यांच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत. हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला शिंदे यांच्या मेळाव्यात लोक येतील. निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देणार. धनुष्यबाण शिंदे यांच्याकडे असेल, असा दावाही त्यांनी केला.