भाजपात येण्यास इच्छुक नवनीत राणांची महासंमेलनात चर्चा; जागोजागी पोस्टर्स, नेत्यांचे फोटो!
By योगेश पांडे | Published: March 4, 2024 09:18 PM2024-03-04T21:18:18+5:302024-03-04T21:18:45+5:30
भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजयुमोच्या महासंमेलनाच्या माध्यमातून अनेक राजकीय वक्तव्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून देण्यात आली. मात्र महासंमेलनात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीत व परिसरातील केलेली पोस्टरबाजी हा चर्चेचा मोठा विषय ठरला. नवनीत राणा भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा असताना कार्यक्रमाच्या वेळी दाखविलेली ताकद हा नेमका कुठला संकेत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानात सोमवारी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारपासूनच राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली होती. भाजपने कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडून भगव्या टी शर्ट व टोप्या दिल्या होत्या. मात्र त्यातही पांढऱ्या टी शर्टमधील अनेक कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. प्रत्यक्षात हे सर्व अमरावती व आजुबाजुच्या परिसरातून आलेले युवा स्वाभीमान पक्षाचे कार्यकर्ते होते. टी शर्ट वर नवनीत राणा यांचे चित्र होते. अंबाझरीपासून कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या मार्गावरदेखील जागोजागी नवनीत राणा यांचे पोस्टर्स लागले होते.
या पोस्टर्सवर नाव युवा स्वाभिमान पक्षाचे होते. मात्र त्यावर पंतप्रधान मोदींपासून राज्यातील भाजप नेत्यांचे चेहरे होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. कार्यक्रम सुरू होत असताना राणा स्वत: मंचावर आल्या. त्यामुळे राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशच होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र कार्यक्रमात असे काहीही झाले नाही.
राणा यांचे ‘सेफ’ वक्तव्य
यासंदर्भात राणा यांना विचारणा केली असता त्यांनी ठोस उत्तर देण्याचे टाळले. विदर्भाच्या विकासासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांनी खूप काही केले आहे. भाजपचे नेते माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत, अ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मी आहे व पुढेदेखील राहणार आहे. एखाद्या चिन्हावर लढण्यापेक्षा संबंधितांसोबत राहणे जास्त महत्त्वाचे असते, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
पक्ष नेत्यांचे कट आऊट्स
दक्षिण भारतातील प्रचारशैलीप्रमाणे आता मोठे कट आऊट्स लावण्यावर भर देण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणारा मार्ग व प्रत्यक्ष मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व शहराध्यक्ष बंटी कुकडे यांचे मोठे कट आऊट्स लागले होते.