सात कर्जदारांमुळे बुडाली नवोदय बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:14 PM2018-10-11T12:14:12+5:302018-10-11T12:14:41+5:30

रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे.

Navodaya Bank collapsed due to seven borrowers | सात कर्जदारांमुळे बुडाली नवोदय बँक

सात कर्जदारांमुळे बुडाली नवोदय बँक

Next
ठळक मुद्देअध्यक्षांचे अज्ञानही भोवले

सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यानंतर आता नवोदय अर्बन कोआॅपरेटिव्ह बँकेचे अवसायन होणार हे स्पष्ट आहे. पण ही बँक केवळ सात बड्या कर्जदारांनी कर्ज परतफेड न केल्याने व अध्यक्षांच्या अज्ञानामुळे बंद होणार आहे. लोकमतने केलेल्या तपासात नवोदय बँकेजवळ आजमितीला ५० कोटींच्या ठेवी आहेत व कर्जवाटप ५५ कोटीचे आहे. मजेची बाब म्हणजे यापैकी फक्त सात कर्जदारांकडे ३५ कोटी कर्ज थकीत आहे.
हे कर्जदार पुढीलप्रमाणे १) ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.- ११ कोटी, २) विजय जोशी समूह- ११ कोटी, ३) मनमोहन हिंगल- ७ कोटी, ४) हेमंत झाम बिल्डर्स- ३ कोटी, ५) अर्थवैश्य हॅबिटॅट प्रा. लि.- ९५ लाख, ६) एचक्यू बिल्डर्स- ७० लाख व ७) मनीष ढोले बिल्डर्स- ६० लाख. या कर्जदारांनी आपले अर्धे कर्ज जरी परतफेड केले असते तर नवोदय बँक तरून गेली असती. पण ते घडले नाही म्हणून बँक बुडली हे स्पष्ट आहे. यापैकी ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरची बेसा येथे फ्लॅट स्कीम आहे व ती बँकेकडे गहाण आहे. तिचे बाजारमूल्य २८ कोटी आहे. पण बँकेने दोनवेळा प्रयत्न करूनही मालमत्ता विकल्या जाऊ शकली नाही.
ग्लॅडस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरचे भागीदार सचिन मित्तल व बाळकृष्ण गांधी हे आहेत. विजय जोशी समूहाच्या दोन ते तीन कंपन्यांकडे नवोदय बँकेचे ११ कोटी थकीत आहेत. परंतु हे कर्ज कोणत्या व्यवसायासाठी दिले ते अध्यक्ष अशोक धवड यांनाच माहीत नाही. ‘प्रॉपर्टी डेव्हलपमेंटसाठी कर्ज दिले’ एवढेच धवड सांगतात. विजय जोशी यांनी दिलेला धनादेश वटला नाही म्हणून त्यांच्यावर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस अ‍ॅक्टच्या कलम १३८ अन्वये कोर्टात केस सुरू आहे. त्यांनी बँकेत काय तारण दिले हे कळू शकले नाही.
मनमोहन हिंगल समूहाकडे बँकेचे सात कोटी थकीत आहे. तारण म्हणून हिंगल समूहाने वर्धा रोडवरील ली मेरिडियन हॉटेलजवळचा एक ५०,००० चौ.फुटाचा भूखंड गहाण ठेवल्याचे कळते. या भूखंडाची नक्की किंमत कळू शकली नाही.
हेमंत झाम बिल्डर्सकडे तीन कोटी थकीत आहे. या कर्जदाराने वानाडोंगरीजवळ एक भूखंड गहाण ठेवला आहे. किंमत माहीत नाही.अर्थवैश्य हॅबिटॅट ही दुदानी यांची कंपनी आहे. कंपनीने इतवारीतील एक मालमत्ता नजरगहाण म्हणून दिली आहे. नक्की किंमत माहीत नाही. याचबरोबर एचक्यू बिल्डर्स व मनीष ढोले बिल्डर्स यांच्याही बाबत फारशी माहिती मिळू शकली नाही.

लोकमतशी बोलताना नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी आपण सभासदांनी निवडून दिलेले अध्यक्ष आहोत. त्यामुळे जनरल मॅनेजर/सीईओ यांच्या सूचनेनुसार काम करत होतो असा बचावात्मक पवित्रा घेतला. पण हे कारण पटणारे नाही. बँकेच्या पतनासाठी धवड यांचे बँक व्यवसायाबद्दलचे अज्ञान व अनास्था तेवढीच कारणीभूत आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत धवड यांची आर्थिक जबाबदारी निश्चित होणार व ती रक्कम भविष्यात त्यांच्याकडून वसूल होणार हे नक्की आहे.

Web Title: Navodaya Bank collapsed due to seven borrowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक