नवोदय बँक घोटाळा : परतफेडीची क्षमता नसतानाही धवड यांनी दिले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:44 AM2019-05-19T00:44:01+5:302019-05-19T00:45:41+5:30
सुमारे ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यासाठी सर्वत्र चर्चित असलेले नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी अधिकाराचा वापर करीत वर्ष २०११ मध्ये परतफेडीची क्षमता नसतानाही सहा जणांना २.६९ कोटींचे कर्ज मंजूर करून बँकेला चुना लावला आहे. कर्ज मंजूर करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका धवड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोरेश्वर मानापुरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुमारे ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यासाठी सर्वत्र चर्चित असलेले नवोदय अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांनी अधिकाराचा वापर करीत वर्ष २०११ मध्ये परतफेडीची क्षमता नसतानाही सहा जणांना २.६९ कोटींचे कर्ज मंजूर करून बँकेला चुना लावला आहे. कर्ज मंजूर करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका धवड यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वार्षिक उत्पन्न ३ लाख, मासिक हप्ता ६० ते ७० हजार!
गिरीश बाळासाहेब मंदाखलीकर, रितेश सर्वदमन बिल्लोरे, सचिनकुमार हिरालाल कश्यब, मनीष किसनलाल गांधी आणि अन्य दोघे अशा सहा कर्जदारांचे वार्षिक उत्पन्न २.५० ते ३ लाखांदरम्यान होते. त्यांची परतफेडीची क्षमता नसताना आणि दरमहा ६० ते ७० हजार रुपयांच्या कर्जाचा हप्ता व त्यावरील व्याज भरण्याची क्षमता नसतानाही बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे यांनी कर्जदारांना २.६९ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून बँकेला अडचणीत आणले. या सर्वांचे बेसा येथे डुप्लेक्स आणि फ्लॅट आहेत. तारण मालमत्तेचे मूल्यांकन बँकेच्या पॅनलवरील आर्किटेक्ट प्रसाद के. पिंपळे यांनी काढले आहे. या कर्जाचे हप्ते बँकेला कधीच मिळाले नाहीत.
याशिवाय सिगटिया समूहाचे ललित मोहन सिगटिया आणि त्यांच्या भागीदाराकडे कर्ज बाकी असतानाही तारण मालमत्तेचे मूळ कागदपत्रे परत आणि गहाळ करून बँकेचे आर्थिक नुकसान केले आहे.
सोसायट्यांना थकीत कर्जदारांचे डुप्लेक्स, प्लॉट, फ्लॅट केले वळते
नवोदय बँकेत नागपुरातील जवळपास ६६ पतसंस्था, सोसायट्या आणि अर्बन बँकांच्या ४० कोटींच्या ठेवी होत्या. २०१७ मध्ये बँक अडचणीत आल्याचे समजताच सोसायट्यांनी ठेवी परत करण्यासाठी धवड यांच्याकडे तगादा लावला. बँक डबघाईस आल्यामुळे धवड यांना ठेवी परत करणे शक्य नव्हते. त्यांनी रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आणि नियमांना झुगारून सोसायट्यांना अन्य प्रकारे ठेवी परत करण्याचा निर्णय घेतला. काही थकीत बिल्डर कर्जदारांचे प्लॉट, फ्लॅट, दुकाने, डुप्लेक्सचे मूल्यांकन करून सोसायट्यांना त्यांच्या बँकेत असलेल्या ठेवीनुसार त्यांच्या नावावर करून दिल्या. सोसायट्यांच्या नावावर वळती केलेली सर्व प्रॉपर्टी आता बँकेकडे परत आणण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
या माध्यमातून धवड यांनी २५ ते ३० सोसायट्यांना ठेवी परत केल्या आणि कर्जदारांना कर्जातून मुक्त केले. ही प्रक्रिया रिझर्व्ह बँकेच्या नियमाविरुद्ध आहे. याद्वारे धवड यांनी बँकेची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेकांच्या ठेवी १ लाखावर आणल्या
बँक बुडाल्यानंतर राज्य शासनाच्या विमा गॅरंटी योजनेंतर्गत ठेवीदारांना १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळतात. ही बाब हेरून धवड यांनी आपल्या मर्जीतील अनेक ठेवीदारांच्या ठेवींचे विभाजन करून १ लाख रुपयांवर आणल्या. अशी फसवणूक करून धवड यांनी शासनालाही चुना लावण्याचा प्रयत्न केला आहे. असा घोटाळा धवड यांनी रिझर्व्ह बँकेने व्यवहारावर निर्बंध लावल्यानंतर केला आहे.
अटक टाळण्यासाठी धवड यांचे प्रयत्न
आर्थिक घोटाळ्यात गुन्हे शाखेने बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, पदाधिकारी, संचालक आणि अधिकारी अशा २५ जणांवर बुधवार, १५ मे रोजी गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत बँकेतून हार्डडिस्क, कर्जप्रकरणांसह महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याआधारे पोलीस सर्वांना अटक करण्याची शक्यता आहे. त्यातच राजकीय क्षेत्रात वरदहस्त ठेवणारे धवड यांनी अटकपूर्व जामिनासाठी तयारी चालविली आहे. ते सध्या इंदूरला आहेत. नागपुरात येताच अटक टाळण्यासाठी धंतोलीतील एका हॉस्पिटलमध्ये भरती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.