तीन बड्या थकबाकीदारांमुळे नवोदय बँक अडचणीत
By admin | Published: June 17, 2017 02:21 AM2017-06-17T02:21:48+5:302017-06-17T02:21:48+5:30
तीन बड्या समूहांनी कर्ज थकविल्यामुळे संचालकांच्या अव्यावसायिक कामकाजामुळे नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक
संचालकांची अव्यावसायिकता नडली : कशी होणार वसुली ?
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन बड्या समूहांनी कर्ज थकविल्यामुळे संचालकांच्या अव्यावसायिक कामकाजामुळे नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक अडचणीत आली असल्याचे उघड झाले आहे.नवोदय बँकेचे एकूण कर्ज ४७ कोटी आहे व त्यापैकी ४५ कोटींचे कर्ज थकीत (एनपीए) झाले आहे. मजेची बाब म्हणजे यापैकी तब्बल ३२.४५ कोटी कर्ज फक्त तीन उद्योग समूहांनी थकविले आहे.
यामध्ये ग्लॅडस्टन इन्फ्रास्ट्रक्चर समूह- ८.३४ कोटी, मनमोहन ट्रेडिंग कंपनी- ११.२१ कोटी व जोशी कन्सलटन्सी- १२.९० कोटी या समूहांचा समावेश आहे. या तीन समूहांकडची थकबाकी वसूल झाली तर नवोदय बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ बँक बनू शकते आणि हेच आव्हान आता नव्याने आलेल्या प्रशासक सतीश भोसले यांचेसमोर आहे.
याबाबतीत संपर्क केला असता ग्लॅडस्टन समूहाचे बालकिशन गांधी यांनी आमच्याकडे २ ते २.५० कोटी (८.३४ कोटी नव्हे) हे मान्य केले. आमची शांतीनिकेतन गृह प्रकल्प बेसा येथे आहे. चार वर्षांपासून राज्य सरकारने या भागातील विक्रीपत्राच्या रजिस्ट्रीवर बंदी घातली आहे त्यामुळे आमची घरे विकली जात नाही. बंदी हटली तर आम्ही कर्जाची परतफेड करायला तयार आहोत, असे गांधी म्हणाले.
मनमोहर ट्रेडिंग कंपनीचे मनमोहन हिंगल यांनीसुद्धा थकबाकी तीन ते साडेतीन कोटी आहे. (११.२१ कोटी नाही) हे मान्य केले. कर्ज थकायसाठी खूप कारणे आहेत त्याबद्दल नंतर बोलू, असे हिंगल म्हणाले.
जोशी कन्सलटन्सीच्या विजय जोशींशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान अशोक धवड यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळामध्ये व्यावसायिकतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे नवोदय बँक अडचणीत आल्याची चर्चा शहरात आहे.
याला दुजोरा देताना नवोदय बँकेच्या एका माजी सल्लागाराने गोपनीयतेच्या अटीवर लोकमतला सांगितले की, संचालक मंडळाने जोशी कन्सलटन्सी विरुद्ध चेक बाऊन्स झाल्याबद्दल ज्या केसेस दाखल केल्या होत्या त्या परत घेतल्या. एवढेच नव्हे तर हा समूह बँकेचे १२ कोटी थकविणारा कर्जदार असूनही त्याला ना हरकत प्रमाणपत्रही देऊन टाकले होते. या अशा मनमानी अव्यावसायिक कारभारामुळे बँक अडचणीत आली यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, असे हा सल्लागार म्हणाला.
अशोक धवड यांनी हे नाकारले. आम्ही सल्लागाराच्या सूचनेवरूनच काम केले व त्यानेच चुकीचा सल्ला देऊन बँकेला अडचणीत आणले आहे, असा आरोपही धवड यांनी केला.