नवोदय अर्बन बँक घोटाळा : अशोक धवड यांनी दोन वर्षांत केली ५.३९ कोटींची परस्पर उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:17 PM2019-05-17T21:17:56+5:302019-05-17T21:19:48+5:30
नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात बँकेचे सर्वेसर्वा अशोक धवड हेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या घोटाळ्याची शृंखला मोठी आहे. कर्जदारांची मालमत्ता अस्तित्वात नसतानाही त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज वाटून स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. ३६४ पानांच्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाद्वारे धवड यांच्या आर्थिक घोटाळ्याची कृत्ये उजेडात आली आहेत. त्या आधारे बँकेचे पदाधिकारी, संचालक आणि अधिकारी अशा २५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ३९ कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात बँकेचे सर्वेसर्वा अशोक धवड हेच मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्या घोटाळ्याची शृंखला मोठी आहे. कर्जदारांची मालमत्ता अस्तित्वात नसतानाही त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बोगस कर्ज वाटून स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. ३६४ पानांच्या वैधानिक लेखा परीक्षण अहवालाद्वारे धवड यांच्या आर्थिक घोटाळ्याची कृत्ये उजेडात आली आहेत. त्या आधारे बँकेचे पदाधिकारी, संचालक आणि अधिकारी अशा २५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
धवड यांची जोशी बंधूंवर कृपा
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार अध्यक्ष असो वा संचालक कुणालाही बँकेतून एक रुपयाही घेता येत नाही. पण अध्यक्षपदाचा दुरुपयोग करीत अशोक धवड यांनी स्वत:च्या फायद्यासाठी रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवून २०१४-१५ मध्ये व्हाऊचरद्वारे ४ कोटी ५० लाख रुपयांची परस्पर उचल केली आहे. या रकमेच्या समायोजनासाठी धवड यांनी २ जून २०१५ रोजी कॉम्प्युटरमध्ये छेडछाड करून ३० मार्च २०१५ च्या ओरिजनल कॅश बुकमध्ये ४.५० कोटी रुपयांची नोंद करून बँकेची कॅश वाढविली. खरं पाहता ही रक्कम बँकेला प्राप्त झालीच नाही. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एवढी रक्कम बँकेला दाखविता येत नाही. पण धवड यांनी अधिकार वापरून हा प्रताप केला.
बँकेच्या कॅशबुकमध्ये जमा दाखविलेल्या रकमेची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी गोविंद सु. जोशी, विक्रम के. जोशी यांना प्रत्येकी १.१५ कोटी आणि प्रकाश शा. शर्मा यांना २.३० कोटी रुपयांचे कर्ज बेसा आणि महाल शाखेतून वितरित केले. एवढ्या मोठ्या कर्जासाठी धवड यांनी कर्जदारांकडून कोणतीही कागदपत्रे घेतली नाही. अहवालात ४.५० कोटींचे कर्ज थकित असल्याची नोंद आहे. पण अशोक धवड यांनी ४.५० कोटी रुपयांची स्वत:च उचल केली आहे.
प्लॉटचे खोटे मूल्यांकन करून २.६९ कोटींचे कर्जवाटप
दुसऱ्या प्रकरणात कश्यप नामक सहा लोकांना २ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याकरिता बँकेचे व्हॅल्युअर प्रसाद के. पिंपळे यांनी अशोक धवड यांच्या आदेशावरून अस्तित्वात नसलेल्या प्लॉटचे मूल्यांकन करून बँकेत सादर केले आणि मूल्यांकन किमतीच्या आधारावर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे यांनी २.६९ कोटींचे कर्जवाटप करून बँकेला चुना लावला आहे. समीर चट्टे हा देना बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात आरोपी आहे. या कर्जाची रक्कम अशोक धवड यांनी स्वत:च गिळंकृत केली आहे. अस्तित्वात नसलेल्या लोकांना कर्ज वाटून बँकेला संकटात लोटल्याचा शेरा लेखा परीक्षकांनी अहवालात नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्ज घेतलेले लोक नमूद पत्त्यावर कधीच राहात नव्हते, अशीही नोंद अहवालात आहे.
वरिष्ठ लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांच्यामुळेच आर्थिक घोटाळ उघड
भंडाराचे मुख्य लेखा परीक्षक श्रीकांत सुपे यांनी आर्थिक वर्ष २०१५ ते २०१७ या दोन वर्षांतील आर्थिक व्यवहाराची तपासणी आणि बारकाईने चौकशी केल्यामुळेच ३९ कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. सहकार आयुक्त दळवी यांच्या आदेशानंतरही सुपे यांनी बँकेचे अंकेक्षण करू नये, याकरिता धवड यांनी राजकीय दडपण आणले. याकरिता त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे अपील केले. मंत्र्यांनी दळवी यांचा आदेश रद्द केला. पण दळवी यांनी पुन्हा सुपे यांचा आदेश नव्याने काढला.
यादरम्यान धवड यांनी पनिया अॅण्ड चंदवानी या सीए फर्मकडून आर्थिक वर्ष २०१५-१६ चे ऑडिट करून घेतले. पण ऑडिटमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या फर्मने ऑडिट गुन्हे शाखेकडे सादर केलेच नाही. अखेर या वर्षाचेही ऑडिट श्रीकांत सुपे यांनी केले. दोन वर्षांचे ऑडिट त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण केले. सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांच्या परवानगीनंतर ७ जून २०१८ रोजी अध्यक्ष, संचालक आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी सुपे यांनी ३६४ पानांचा अहवाल धंतोली पोलिसांना दिला. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. २५ जणांवर गुन्हा नोंदविण्यासाठी तब्बल ११ महिन्यानंतर १५ मे दिवस उजाडला.