नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

By मोरेश्वर मानापुरे | Published: October 10, 2023 06:59 PM2023-10-10T18:59:23+5:302023-10-10T19:00:39+5:30

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह, प्रत्येक ड्रेसवर नवीन दागिने, ट्रेंडी चनिया-चोलीला मागणी.

navratri festival is coming with new clothing trends garba new dress every day | नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

मोरेश्वर मानापुरे, नागपूर : शक्ती उपासनेचा महापर्व नवरात्रीला लवकरच प्रारंभ होणार आहे. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. पंचांगानुसार, यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबरला सुरू होऊन २३ ऑक्टोबरपर्यंत असेल. नवरात्रीचे ९ दिवस देवीच्या ९ रूपांना समर्पित आहेत. या दिवसात नागपूर शहरात आयोजित होणाऱ्या गरबा उत्सवात नवीन कपड्यांचा ट्रेंड बघायला मिळणार आहे. यंदा ड्रेसच्या किमती दीडपटीने वाढल्या आहेत. यंदा नागपुरात गरब्याचे ड्रेसेस आणि आर्टिफिशियल दागिन्यांची उलाढाल कोटींची होणार आहे.

तरुणाईमध्ये गरब्याचा उत्साह

गरब्यासाठी लागणारे कपडे, दागिने अन्य मॅचिंग वस्तू खरेदीसाठी लोकांची बाजारात गर्दी झाली आहे. गुजराती लोकांसाठी रास गरबा खूप विशेष असते. त्यात महाराष्ट्रीयन लोकांची भर पडली आहे. नवरंगाचे, नवढंगांचे कपडे परिधान करण्यासाठी त्यांची महिन्याभरापासून तयारी सुरु झाली असते. गरब्याच्या संपूर्ण पेहरावाची खरेदी करतात. यंदाही बाजारात नवरात्रीनिमित्त बराच फॅशन ट्रेंड पाहायला मिळत आहे. गुजरात आणि राजस्थान येथील ड्रेसेसला जास्त मागणी मागणी आहे.

नऊ दिवसात घालतात विविध रंगाचे कपडे

देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध रंगांचे कपडे वापरून देवीचा आशीर्वाद मिळवता येतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेकजण ९ दिवसात ९ रंगांचे कपडे घालतात. नऊ दिवस चालणाऱ्या दांडियात अनेक दाम्पत्य दरदिवशीचे वेगवेगळ्या रंगाचे ड्रेसेस खरेदी करतात. मागणी पाहून दुकानदारांनीही गरब्यासाठी गुजरात आणि राजस्थान येथून कपडे विक्रीसाठी आणले आहेत. 

चनियाचोली, मयूरी नेट, नवरंग कपड्यांना मागणी

दांडिया आणि गरब्यासाठी डिझायनर चनियाचोलीसह मयूरी, रजवाडी, मयूरी नेट, सनेडो, रामलीला झुमका, बोल बच्चन नवरंग, कच्छी वर्क, फॅन्शी धोती, नक्षीकाम केलेले जॅकेट्सला मागणी आहे. पुरुषांसाठी नवरात्री स्पेशल केडीयूमध्ये वेगवेगळे प्रकार आणि लहान मुलांसाठीही पारंपारिक पद्धतीचे केडीयू दिसत आहे. तरुण-तरुणीचे ड्रेसेस १५०० ते २ हजार रुपये आहेत. बहुतांश गरबाच्या आयोजनात दरदिवशीचा ड्रेस वेगळा असतो. त्यामुळे खर्च जास्त येतो.

सौंदर्य खुलविणारी ऑक्साइड ज्वेलरी

श्रृंगारासाठी नवनवीन आर्टिफिशियल ज्वेलरी बाजारात विक्रीस आहे. बरीच ज्वेलरी राजकोट येथून नागपुरात विक्रीला येते. घागरा आणि चनियाचोलीवर ऑक्साइडची ज्वेलरी विशेष खुलून दिसते. बाजारात नेकलेस, चोकर, पेंडंट्ससह अंगठी, झुमके, कमरपट्टा, लोकर आणि मोत्यांपासून बनवलेली आकर्षक ज्वेलरीही विक्रीस आहे. त्यात बाजूबंद, मांगटिका, कडा, झुमके, ब्रेसलेट, हारसेट, कमरबंध, बाजूबंध, बांगड्या, इअरिंगची रेंज आहे. ब्लॅक मेटलमध्ये मल्टी ऑक्सिडाईज सेट तसेच आकर्षक ज्वेलरीची क्रेस दांडियाप्रेमींमध्ये दिसून येत आहे.

दांडिया व गरब्यासाठी भाड्याने मिळतात ड्रेसेस

आपण इतरांपेक्षा जरा हटके दिसावे असे दांडिया आणि गरबा प्रेमींना वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी वेगवेगळे ड्रेस घ्यावे लागतात. हे ड्रेस खरेदी करण्यासाठी पैसे जास्त लागतात. पैशांची बचत करण्यासाठी दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी ड्रेस भाड्याने मिळण्याची सोय नागपुरात आहे. दरदिवशी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत भाडे आहे. याशिवाय ज्वेलरीही भाड्याने मिळते. अनेजण एक दिवस गरबा खेळण्यासाठी ड्रेस भाड्याने आणतात.

व्यापारी काय म्हणतात ..

नवरात्र उत्सवात बाजारपेठेत उत्साह असतो. बहुतांश व्यापारी डिझायनर गरबा ड्रेसेस, आर्टिफिशियल दागिने आणि दांडिया स्टिकचा व्यवसाय करतात. तयारी महिन्याआधीपासून असते. गुंतवणूक मोठी आणि जोखिम जास्त असते. गुजरातेतून ड्रेसेस आणि राजकोट येथून कृत्रिम दागिने विक्रीला येतात.
पंकज पडिया, व्यावसायिक.

युवा काय म्हणतात....

दांडिया आणि रास गरबा सर्व मित्र मिळून दरवर्षी साजरा करतो. त्याकरिता अतिरिक्त खर्च येतो. तरुण वयात आनंद लुटण्याची मजा वेगळीच असते.
कुंदन पानसे, विद्यार्थी.

नवरात्रोत्सवात अभ्यासाचे टेंशन नसते. त्यामुळे दांडिया आणि रास गरबा सण उत्साहात साजरा करतो. सर्व मित्र एकत्रितपणे दोन वा तीन दिवस गरबाचा मजा लुटतो. कायरा बिलसे, विद्यार्थी.

Web Title: navratri festival is coming with new clothing trends garba new dress every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.