नागपुरातल्या अनाथाश्रमातील मुलांसाठी उत्सवाचे ‘नवतेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 10:03 AM2018-11-05T10:03:07+5:302018-11-05T10:06:36+5:30

अनाथाश्रमातील मुलांसाठी दिवाळी उत्सवाप्रमाणे हा आनंद मिळणेही दुर्मिळ गोष्ट. या मुलांना दिवाळीच्या उत्सवासोबत इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खास कल्चरल दिनाचा आनंद देण्याचे काम ‘परिंदे’च्या तरुणांनी केले आहे.

'Navtej' festival for children of Nagpur orphanage | नागपुरातल्या अनाथाश्रमातील मुलांसाठी उत्सवाचे ‘नवतेज’

नागपुरातल्या अनाथाश्रमातील मुलांसाठी उत्सवाचे ‘नवतेज’

Next
ठळक मुद्दे‘परिंदे’च्या तरुणांची दिवाळी भेट ४०० मुलांनी साजरा केला आनंदोत्सव

निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीच्या काळात या सणाच्या उत्साहात लहान मुलांसह तरुणांनाही खास प्रतीक्षा असते ती शाळा-महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक दिन (कल्चरल डे) समारोहाची. वर्षभर अभ्यासाच्या पुस्तकात रेंगाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘कल्चरल डे’ म्हणजे आनंद, उत्साह आणि धमाल करण्याचा क्षण. मात्र अनाथाश्रमातील मुलांसाठी दिवाळी उत्सवाप्रमाणे हा आनंद मिळणेही दुर्मिळ गोष्ट. प्रत्येक बाबतीत अभावात जगणाऱ्या या मुलांना दिवाळीच्या उत्सवासोबत इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खास कल्चरल दिनाचा आनंद देण्याचे काम ‘परिंदे’च्या तरुणांनी केले आहे. विविध अनाथाश्रमात राहणाऱ्या जवळपास ४०० मुलांसोबत अतिशय आकर्षक आयोजनासह हा अविस्मरणीय आनंद साजरा करण्यात आला.
‘परिंदे’ म्हणजे कुणाचीही, कसलीही तमा न बाळगता आकाशात मुक्तविहार करणारे पक्षी. तरुणाई म्हणजे या पक्ष्यांप्रमाणेच मुक्तविहार करण्याची अवस्था. मात्र असा मुक्तविहार करतानाच कुठलीतरी संवेदना बाळगून समाजाला आपण काहीतरी देऊ शकतो, याची जाणीव असलेल्या तरुणांचा ग्रुप म्हणजे ‘परिंदे’. कुणी शिक्षण घेत आहेत तर कुणी जॉब करीत आहेत. मात्र त्यांच्यातील संवेदना अतिशय व्यापक. एका छोट्या कामासाठी एकत्र आलेल्या तरुणांनी प्रत्येकाला प्रेरणादायी वाटावे इतके आपले सेवाकार्य व्यापक केले आहे. दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या कार्याची दखल घ्यावी, हे त्यांच्या कामाचे मोठेपण. समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या आणि अभावात जगणाºया मुलांसाठी वर्षभर काही ना काही उपक्रम राबविणाºया परिंदे ग्रुपतर्फे खास अनाथाश्रमातील मुलांसाठी दिवाळीनिमित्त आयोजित होणारा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे ‘नवतेज’. अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी करणारा हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून घेतल्या जात असून, यावर्षीही या तरुणांनी दुप्पट उत्साहात आकर्षक रूपात हे अनोखे आयोजन केले.
शहरातील नऊ अनाथाश्रम, रेड लाईट एरियातील संस्थांमध्ये असलेली मुले आणि रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांसाठी रविनगरच्या अग्रसेन भवन येथे हे विशेष आयोजन करण्यात आले. परिंदेच्या तरुणांनी खास बसची व्यवस्था करून या मुलांना येथे आणले. त्यांच्यासाठी आदल्या दिवशीपासून ग्रुपच्या सदस्यांनी सभागृहाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. बसमधून मुले सभागृहात पोहोचताच फुलांचा वर्षाव करीत आणि ढोलताशा वाजवीत खास त्यांचे स्वागत करण्यात आले. लगेच नाश्त्याची व्यवस्था केल्यानंतर रांगोळी स्पर्धा, चित्रकला आणि दिव्यांवर पेंटिंग करण्याची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर ‘आयक्लीन नागपूर’च्या टीमने नाट्यप्रयोग सादर करून मुलांना स्वच्छता व सुशोभिकरणाचे धडे दिले.

परिंदे ग्रुपचे सेवाकार्य...
मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. आशा दवे यांनी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. यानंतर मनप्रीत सपकाळ यांनी या मुलांना ‘गुड टच-बॅड टच’ कसा ओळखावा, याचे मार्गदर्शन केले. या मुलांसाठी नृत्य स्पर्धा व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये या मुलांनी सहभाग घेत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. विशेष म्हणजे प्रशिक्षित नृत्य दिग्दर्शकाद्वारे या मुलांना ट्रेनिंगही देण्यात आली होती. सर्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना आकर्षक पुरस्कारही प्रदान करण्यात आले. प्रत्येक मुलांना कपडे आणि खास दिवाळी भेटही देण्यात आली. यानंतर सर्व मुलांनी डीजेच्या तालावर डान्सचा मनसोक्त आनंद लुटला. या मुलांना गोडधोड जेवणाच्या नियोजनासाठी नैवेद्यमने सहयोग केला होता. हा आनंद पाहून ग्रुपच्या प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक समाधान दिसून येत होते.

Web Title: 'Navtej' festival for children of Nagpur orphanage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.