नक्षलसमर्थक शोमा सेनला विद्यापीठाचा ‘धक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 10:29 PM2018-06-14T22:29:37+5:302018-06-14T22:29:48+5:30
नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नक्षली कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दणका दिला आहे. त्यांना पदव्युत्तर इंग्रजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक या पदावरून निलंबित करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेतला असल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
नक्षली कारवायांमधील सहभागी, पुण्यातील ‘एल्गार’ परिषदेच्या माध्यमातून हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली ६ जून रोजी पुणे पोलिसांनी प्रा.शोमा सेन यांना त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी त्यांच्यासह एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये अॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन यांचा समावेश होता. प्रा.सेन विद्यापीठाच्या सेवेत असल्याने अटकेनंतर ४८ तासांच्या आत त्यांचे निलंबन होणे आवश्यक होते. मात्र दबावगट सक्रिय झाल्याने विद्यापीठाने कारवाईस टाळाटाळ केली व निलंबन झालेच नाही. यासंदर्भात अखेर कुलगुरूंनी कायदेशीर सल्ला घेतला व प्रा.सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश निघण्याची शक्यता आहे.
‘तो’ फोन कुणाचा ?
दरम्यान, विद्यापीठाने प्रा.सेन यांच्या अटकेच्या ४८ तास उलटून गेल्यानंतरदेखील कारवाई न केल्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत होते. ही बाब थेट मंत्रालयातदेखील पोहोचली होती. कुलगुरुंना यानंतर मुंबईहून एक फोन आला व त्यानंतर निलंबनाबाबतची सूत्रे हलली. विद्यापीठाने वेळेत कारवाई का केली नाही व हा फोन नेमका कुणाचा होता हा प्रश्न उपस्थित होत आहे.