नागपुरात गुंडासह नक्षल समर्थकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:58 AM2019-03-18T10:58:55+5:302019-03-18T10:59:50+5:30

कुख्यात गुंड आणि नक्षल समर्थक इरफान चाचू तसेच नरेंद्र कोडापेसह १७ जणांना राजस्थानमध्ये जाऊन पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले.

Naxal supporters arrested in Nagpur | नागपुरात गुंडासह नक्षल समर्थकांना अटक

नागपुरात गुंडासह नक्षल समर्थकांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देपाचपावली पोलिसांची अजमेरजवळ कारवाई १७ जणांना नागपुरात आणले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड आणि नक्षल समर्थक इरफान चाचू तसेच नरेंद्र कोडापेसह १७ जणांना राजस्थानमध्ये जाऊन पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या सर्वांना शनिवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. मात्र, ज्याच्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता, ते कुख्यात नौशाद आणि इरफान पोलिसांना चकमा देऊन अजमेर जवळून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
शहरातील कुख्यात आणि मुख्य गुन्हेगारांच्या टोळींपैकी एक असलेली इप्पा टोळी संचलित करणारा तसेच पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात गुंड नौशाद तसेच इर्शाद राजस्थानमधील अजमेरकडे गेल्याची माहिती पाचपावली पोलिसांना गेल्या आठवड्यात मिळाली होती. त्यावरून परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी कारवाईची तयारी केली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने तीन ते चार दिवस परिश्रम घेतल्यानंतर गुरुवारी आरोपी इरफान चाचू आणि नौशाद बीजनगरजवळ असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिकडे धाव घेतली.
बरीच धावपळ केल्यानंतर शुक्रवारी इरफान चाचू आणि अन्य १६ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. नौशाद, इर्शाद त्यांच्या साथीदारांसह पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेले. ताब्यात घेतलेला इरफान चाचू हा कुख्यात गुंड असून तो तसेच त्याच्यासोबत पकडण्यात आलेला नरेंद्र कोडापे नक्षल समर्थक म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी या सर्वांना शनिवारी मध्यरात्री नागपुरात आणण्यात आले.

१२ जणांना सोडले, पाच जणांना अटक
प्रारंभिक चौकशीत १७ पैकी ९ जणांवर एकही गुन्हा दाखल नसल्याने त्यांना तसेच तिघांवर किरकोळ गुन्हे असल्यामुळे त्यांनाही सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.तर इरफान चाचू (५ गुन्हे), नरेंद्र कोडापे (३ गुन्हे), इल्लू ऊर्फ शेख इलियास (३ गुन्हे), बग्गा १ऊर्फ जाफर खान (२ गुन्हे) आणि शाहबाज शेख यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू होती.

Web Title: Naxal supporters arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.