नक्षलवादी पहाडसिंगचे छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:48 PM2018-08-23T23:48:02+5:302018-08-23T23:50:03+5:30
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पहाडसिंग याच्या आत्मसमर्पणाला महाराष्ट्राच्या नवजीवन योजनेचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे. कारण त्याच आधारे त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न वर्ष-२०१२ पासून करण्यात येत होता. त्याच्या आत्मसमर्पणात त्याच्या दोन्ही मुलींची भूमिका महत्त्वाची समजली जात आहे.
फहीम खान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला आणि कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली नेता पहाडसिंगने अखेर छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
या तिन्ही राज्यांच्या पोलिसांनी त्याच्यावर एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. पहाडसिंग याच्या आत्मसमर्पणाला महाराष्ट्राच्या नवजीवन योजनेचा परिणाम म्हणून पाहिले जात आहे. कारण त्याच आधारे त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न वर्ष-२०१२ पासून करण्यात येत होता. त्याच्या आत्मसमर्पणात त्याच्या दोन्ही मुलींची भूमिका महत्त्वाची समजली जात आहे.
नक्षलविरोधी मोहिमेंतर्गत छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पहाडसिंगने भिलई पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दुर्गचे आयजी जी.पी. सिंह यांनी सांगितले की, आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी पहाडसिंगवर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त २५ लाख रुपयांची राशी एकट्या छत्तीसगड शासनाने जाहीर केली होती. दुर्ग रेंजच्या आयजीसमोर पहाडसिंगने आत्मसमर्पण केले आहे.
१०० पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद
महाराष्ट्राच्या उत्तर गडचिरोली, गोंदिया भागात नक्षली नेता पहाडसिंग याचे नाव नक्षलवादासाठी आजही घेतले जाते. या नक्षलवाद्याची पत्नी सरपंच होती. तिच्यावर त्याच्या मित्रांनीच अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे तिला सरपंचपद गमवावे लागले होते. पत्नीचा पराभव झाल्यामुळे नाराज होऊन मित्रांना धडा शिकवण्यासाठी त्याने नक्षलवाद्यांशी हात मिळवले. त्यानंतर त्याने या भागात दहशत पसरविणे सुरू केले. याच भागात पोलिसांविरोधात अनेक हिंसक कारवायांचे नेतृत्व त्याने केले आहे. तो सीआरपीएफ जवानांच्या हत्यांसह ४० ते ४५ प्रमुख कारवायांमध्ये सहभागी होता. या घटनांची त्याच्यावर केवळ महाराष्ट्रात नोंद आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यास यादी आणखी लांब आहे. गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेज हक नवजीवन योजनेंतर्गत वर्ष-२०१२ मध्ये पहाडसिंगच्या आत्मसमर्पणासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यांनी त्याच्या मुलींशी चर्चा केली होती. त्यावेळी एका मुलीने डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हृदय परिवर्तन : सुवेज हक
गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि आताचे राज्याच्या दहशतवादी सेलचे पोलीस उपमहानिरीक्षक सुवेज हक यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने नवजीवन योजनेंतर्गत वर्ष-२०१२ मध्ये पहाडसिंगच्या दोन्ही मुलींची भेट घेतली होती. या योजनेंतर्गत त्याच्या दोन्ही मुलींना राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरविले होते. त्यांच्याच प्रयत्नाने अखेर पहाडसिंग याचे हृदय परिवर्तन झाले आणि त्याने शस्त्रे त्यागण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात नक्षलवादीविरोधी मोहिमेत कार्यरत अधिकारी आणि जवानांचे मनोबल वाढणार आहे.