नयनतारा सहगल यांच्याहस्ते होणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:53 PM2018-12-27T20:53:37+5:302018-12-27T20:55:38+5:30
यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ग. दि. माडगूळकर यांच्यावरील विशेष कार्यक्रमासह परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, ग्रंथ प्रकाशन, ललित गद्यानुभव व सांस्कृतिक कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी भाषाप्रेमींना मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यवतमाळ येथे डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११, १२ व १३ जानेवारीला आयोजित ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ग. दि. माडगूळकर यांच्यावरील विशेष कार्यक्रमासह परिसंवाद, कविकट्टा, कविसंमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, ग्रंथ प्रकाशन, ललित गद्यानुभव व सांस्कृतिक कार्यक्रमांची साहित्यिक मेजवानी भाषाप्रेमींना मिळणार आहे.
यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंड, समता मैदान येथे होणाऱ्या संमेलन स्थळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा यांच्या संयुक्तवतीने हे संमेलन होत आहे. ११ जानेवारीला दुपारी ४ वाजता नयनतारा सहगल या संमेलनाचे उद्घाटन करतील. नयनतारा या भारताच्या पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित यांच्या कन्या आहेत. उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांच्यासह पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळ अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मदन येरावार, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांची प्रमुख उपस्थिती राहील. सुरुवातीला सकाळी ९.३० वाजता महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असून त्यानंतर लगेच मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या जागेला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर पुढचे दोन दिवस विविध व्यासपीठावर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
शनिवारी १२ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. विद्या बाळ, भ. मा. परसवाळे यांचा सत्कार केला जाणार आहे. रविवारी १३ रोजी दुपारी १.१५ वाजता प्रतिभावंतांच्या सहवासात कार्यक्रम डॉ. विजय भटकर, माधव गाडगीळ, चंद्रकांत कुळकर्णी व डॉ. राणी बंग यांना भेटता येईल. दुपारी २.३० वाजता प्रकट मुलाखत सदरात डॉ. प्रभा गणोरकर यांची मंगेश काळे व डॉ. कविता मुरुमकर मुलाखत घेतील. दुसºया व्यासपीठावर दुपारी १.४५ वाजता 'कथा आणि व्यथा: तांड्यांच्या आणि पोडांच्या' हा कार्यक्रम होईल.
दुपारी ४.३० वाजता खुले अधिवेशन आणि समारोप समारंभ होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी ठराव वाचन केले जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता आकाशवाणी यवतमाळ प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ग्रंथदिंडीचे आकर्षण
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैदानावरून ग्रंथदिंडी निघणार असून २ किलोमीटर मार्गावरील या ग्रंथदिंडीत शेतकऱ्यांची बैलबंडी, गुरुकुंज मोझरीचे बाल भजन मंडळ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चित्र, कलशधारी मुली, अनेक संतांच्या वेशातील मुले-मुली असतील. बंजारा, तीज, लेंगी, आदिवासी लोकनृत्य पथक, दंडार पथक, लेझीम पथक, साहित्यिकांचे दर्शन अशा विविध बाबींचा समावेश असेल.
कविकट्टा, कुवसंमेलन, कवितावाचन
११ तारखेला सायंकाळी कविकट्टाचे उद्घाटन डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेत कविसंमेलन होईल. १२ तारखेला सायंकाळी ५ वाजता मीरा ठाकरे यांच्या अध्यक्षतेत वऱ्हाडी बोली कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता विदर्भ व मराठवाड्यातील नामवंत कवींच्या कवितांचा कार्यक्रम व १३ ला सकाळी ९.३० वाजता मान्यवर कवींचे कवितावाचन होणार आहे.