आता विद्यापीठांमध्ये एनसीसी हा पर्यायी अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:54+5:302021-04-25T04:08:54+5:30
- यूजीसीने दिली मान्यता : नागपूर विद्यापीठात लवकरच लागू होण्याची शक्यता नीलेश देशपांडे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
- यूजीसीने दिली मान्यता : नागपूर विद्यापीठात लवकरच लागू होण्याची शक्यता
नीलेश देशपांडे / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना सैन्य बलात आपले भविष्य घडवायचे आहे; मात्र अपेक्षिक संसाधने नाहीत, त्यांच्यासाठी एक उत्तम संधी विद्यापीठांकडून दिली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पर्यायी अभ्यासक्रम म्हणून पदवी स्तरावर एन.सी.सी.ला मान्यता देण्याच्या अनुषंगाने विचार करण्यास सुरुवात केली आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
१६ मार्च रोजी यूजीसीला एनसीसी महासंचालनालयाकडून एक पत्र प्राप्त झाले होते. या पत्रात एनसीसीला सर्व भारतीय विद्यापीठांमध्ये पर्यायी अभ्यासक्रम म्हणून समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने तत्काळ समर्थन देत यूजीसीने हे पत्र पुढच्या अंमलबजावणीसाठी सर्व विद्यापीठांकडे रवाना करण्यात आले. तद्नंतर विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांनी एनसीसी संबंधितांसोबत आभासी बैठक घेऊन चिंतन सुरू केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी ही बैठक अत्यंत औपचारिक होती, असे सांगितले. पदवी स्तरावर या विषयाचे सादरीकरण कसे करता येईल, यावर यात चर्चा झाली असून, यूजीसीकडून वास्तविक कार्यपद्धती निश्चित झाल्यावरच हे ठरेल. तूर्तास स्थानिक पातळीवर विद्यापीठ स्वत:चा अभ्यासक्रम सादर करणार असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, डॉ. सूर्यवंशी हे स्वत: माजी क्रीडापटू आहेत. हा वैकल्पिक अभ्यासक्रम लागू करण्यामागचा मुख्य हेतू तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे आणि त्यांना शिस्तीची सवय लावणे हा आहे. सैन्य बलामध्ये अनेक संधी आहेत; मात्र त्याबद्दल अनेक तरुणांना माहिती नाही. ज्या तरुणांना सैन्यबलामध्ये आवड आहे, त्यांच्याकडे संसाधनांचा अभाव आहे. अशा विद्यार्थ्यांनी एनसीसी हा वैकल्पिक विषय निवडला तर सैन्य बल आणि संबंधित परीक्षांबाबत त्यांची पूर्वतयारी होईल आणि मूलभूत ज्ञान प्राप्त करता येणार आहे. ही बाब स्पष्ट करताना डॉ. सूर्यवंशी यांनी रिलायन्स फाउंडेशनचे उदाहरण दिले. फाउंडेशनने केवळ पदवीधर एनसीसी कॅडेट्ससाठी सुरक्षा अधिकाऱ्यांची पदे आरक्षित ठेवली आहेत आणि त्यासाठी भरघोस पगारही दिला जातो. विद्यापीठाचे कुलगुरू या विषयावर चर्चा करतील आणि संबंधित महाविद्यालयांना याविषयी जागरुक करतील, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. या आभासी बैठकीत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू चांगदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अभय मुद्गल, प्रियदर्शनी महिला महाविद्यालयाच्या डॉ. सोनाली शिरभाडे, फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे, एनसीसी गोल्डन ग्रुपचे प्रमुख सुधीर देवगीरकर व सोमा किरण उपस्थित होते.
-----------
हा एक स्वागतार्ह निर्णय - शिवाली देशपांडे
फ्लाईट लेफ्टनंट (निवृत्त) शिवाली देशपांडे यांनी यूजीसीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा एक उत्तम निर्णय असून, तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी एनसीसी हा विषय अभ्यासक्रमात असावा. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागण्यास मदत होईल. शिवाय विद्यार्थी प्रारंभीपासूनच शारीरिक व मानसिकदृष्टया मजबूत होतील. केवळ सैन्य दलासाठीच नव्हे तर एक उत्तम नागरिक म्हणूनही विद्यार्थी घडण्यास मदत होईल. नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही आपत्ती व्यवस्थापनाचे धडे कामात येतील आणि लाेकांना मदत करण्यासोबतच प्रथमोपचार तंत्राची माहिती प्राप्त होईल, असे त्या म्हणाल्या.
...............