फडणवीसांच्या घरावर मोर्चा काढणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 09:50 PM2022-10-31T21:50:47+5:302022-10-31T21:51:41+5:30
Nagpur News टाटा एअरबस प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेल्याने नागपुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावर मोर्चा काढला.
नागपूर : टाटा एअरबस प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेल्याने नागपुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चा निघताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्यातील प्रकल्प सातत्याने गुजरातला जात आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी याचे पडसाद नागपुरातही उमटले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते ट्रॅफिक पार्क चौकात पोहोचले. येथून ते धरमपेठ त्रिकोणी पार्क येथील उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या ते तयारीत होते. दरम्यान येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी नारेबाजी सुरू केली. मोर्चा निघताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वातील मोर्चात शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, रायुकाँचे कार्याध्यक्ष नितीन भटारकर शैलेंद्र तिवारी, सौरभ मिश्रा, नूतन रेवतकर, महेंद्र भांगे,सुखदेव वंजारी, शशिकांत ठाकरे,अमोल पारपल्लीवार, सय्यद सुफियान, आशिष पुंड, पूनम रेवतकर, अनिल बोकडे, प्रणय जांभूळकर, अशोक काटले, कपिल आवारे, प्रणव म्हैसेकर, राहुल पांडेय, रोशन निर्मलकर, अमित पिचकाटे, सुमित बोडखे पाटील, विश्वजित सावडिया, विजय गावंडे, दिनेश गावंडे, पिंकी शर्मा, अजहर पटेल, तुषार कोल्हे, रियाज़ शेख, साबीर अली, जयसिंग, तौसीफ शेख, रवि मारशेट्टीवार, सौरभ बंग, रोहित मोटघरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.