भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण
By धीरज परब | Published: December 22, 2022 09:55 PM2022-12-22T21:55:00+5:302022-12-22T21:55:26+5:30
शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा पाटील यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव, मीरा भाईंदर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तसेच अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष असलेले मोहन पाटील यांना दुचाकीस्वारांनी मारहाण केल्याची घटना भाईंदर पूर्वेला गुरुवारी घडली. शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. भाईंदर मधील आगरी समाजाच्या जुन्या व मोठ्या अश्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेत चाललेला वाद पोलीस ठाणे, धर्मादाय आयुक्त व न्यायालयात सुरु आहे . दोन गटात हा वाद सुरु असून पाटील हे गुरुवारी त्यांचे वकील सुशांत पाटील यांच्यासह गाडीने धर्मादाय आयुक्तां कडे असलेल्या सुनावणी साठी चालले होते.
भाईंदर पूर्वेच्या फेमिली केअर रुग्णालया समोर गाडी असताना अचानक एका दुचाकी वरून दोन जण आले आणि गाडीला लाथा मारू लागले . पाटील यांनी गाडी बाजूला उभी करून त्यांना विचारणा केली असता आणखी तीन दुचाकी वरून ६ ते ७ जण आले . त्यांनी मिळून मोहन पाटील यांच्यासह ऍड . सुशांत पाटील व वाहन चालकास लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. वर्दळीचा रस्ता असल्याने आजू बाजूच्या लोकांनी धाव घेऊन पाटील आदींची सुटका केली . दरम्यान हल्लोखोर पळून गेले . या प्रकरणी मोहन पाटील यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. या आधी सुद्धा त्यांना धमक्या आल्या असून पोलिसात तक्रारी केल्या आहेत . अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाच्या जागेच्या वादातून ह्या आधी माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांची सुपारी देऊन निर्घृण हत्या झालेली आहे. आपल्या सुद्धा जीवाला धोका असून पोलिसांनी दिलेल्या तक्रारींचा व आताच्या घटनेचा गांभीर्याने तपास करून आरोपीना अटक करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.