नवनीत राणांनी पुस्तक न पाहता हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; आम्ही शुद्ध भावनेने.. राष्ट्रवादीचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 02:32 PM2022-05-27T14:32:57+5:302022-05-27T19:42:55+5:30
Hanuman Chalisa row : उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हुनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार आहेत.
नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य उद्या (दि. २८) रोजी नागपुरात परतत आहेत. उद्या दुपारी नवनीत राणा या राम नगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. तर, त्याचवेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हनुमान चालीसा व सुंदर कांड पठण करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस व राणा दाम्पत्य आमने-सामने येणार आहेत. यावरून नागपुरातील राजकीय वातावरण आत्तापासून तापायला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रावादी काँग्रेसतर्फे आज उद्या आजोजित करण्यात आलेल्या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता पत्रपरिषद घेण्यात आली होती. यामध्ये, राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना चॅलेंज देण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पुस्तक न पाहता म्हणून दाखवावी, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. आम्ही शुद्ध भावनेने सुंदरकांड पठण करू, वाद घालणार नाही. पण त्यांनी मुंबईसारखा उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. आता यावर राणा दाम्पत्य व समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे राणा समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. राणा दाम्पत्य उद्या विमानाने नागपुरात पोहोचणार असून, त्यानंतर रॅलीद्वारे हनुमान मंदिर बाजी प्रभू चौक रामनगर येथे पोहोचतील. महाआरतीनंतर ते भाविकांना हनुमान चालीसा पुस्तिकेचे वाटप करणार आहेत. अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षाकडून देण्यात आली. तर, आज राष्ट्रवादीकडूनही हनुमान चालीस पठणाबाबत कळवण्यात आले असून उद्या राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हनुमान चालीसावरून काय सामना रंगतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्याची जेलवारी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. काही दिवासांपूर्वीच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेरच हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला होता. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसून आले. हा वाद एवढा वाढला की नवनीत राणा आणि रवी राणा यांना जेलमध्ये जावे लागले होते. यानंतर, नुकतेच त्यांना हनुमान चालीसा म्हटल्यास तुम्हाला जीवे मारू अशी धमकीही मिळाली होती. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. नवनीत राणा यांना धमकी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही नवनीत राणा यांच्यावर अॅसिड फेकण्याची एका अज्ञाताने धमकी दिली असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता.