राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गुजर यांची उचलबांगडी, शहर अध्यक्ष पेठेंचे तळ्यात-मळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:23 AM2023-07-04T11:23:58+5:302023-07-04T11:28:50+5:30
ईश्वर बाळबुधे हे अजित पवारांसोबत : बहुतांश पदाधिकाऱ्यांचे ‘वेट ॲण्ड वॉच’
नागपूर : अजित पवार यांच्या बंडानंतर आता नागपूर शहर राष्ट्रवादीतही फूट पडल्याचे चित्र असून बंडखोर गटाला समर्थन देणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या कृतीचे समर्थन केल्याच्या कारणावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी कार्याध्यक्ष असलेले राजू राऊत यांची हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे हे ‘कन्फ्यूज’ असून, ठोस भूमिका मांडण्यास मागे-पुढे पाहत आहेत. पक्षाच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी मौन धारण करत ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे.
जयंत पाटील यांनी जारी केलेल्या पत्रात बाबा गुजर यांना जिल्हाध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातूनही बडतर्फ करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. तसेच यापुढे पक्षाचे नाव, चिन्हा वापरू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. दुनेश्वर पेठे यांना मात्र असे कुठलेही पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. पेठे यांची अनिल देशमुख, जयंत पाटील व प्रफुल्ल पटेल या तीनही नेत्यांशी जवळीक आहे. पटेल तर मागील तीन महिन्यात दोनदा पेठे यांच्या घरी व कार्यालयात जाऊन आले आहेत. त्यामुळे आता पेठे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. खा. प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. तर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पटेल समर्थक अजित पवारांकडे तर देशमुख समर्थक शरद पवारांकडे असे चित्र नागपूर जिल्ह्यातही निर्माण झाले आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी मंगळवार, ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गणेशपेठेतील कार्यालयात कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे.
मी शहराध्यक्ष आहे, पक्षासोबतच राहीन : पेठे
- या घडामोडीबाबत दुनेश्वर पेठे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘‘मी तीन दिवसांपासून हरिद्वार येथे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कुणाशी संपर्क झाला नाही व चर्चाही करता आली नाही. मी पक्षाचा शहराध्यक्ष आहे. त्यामुळे मी पक्षासोबतच राहीन. पुढे जे काही होईल ते पाहू. उद्या, कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून भूमिका घेतली जाईल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले. पक्षाचे ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
गुजर म्हणतात, देशमुख यांनी कटकारस्थान रचले
मला पदावरून काढण्यासाठी जिल्यातील काही वरिष्ठ नेते सुरुवातीपासून मागे लागले होते. प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख यांनी माझे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी रविवारी रात्री बोलणे करून दिले. होते. त्यांना मी ५ जुलै रोजी भेटतो असे सांगितले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्याशीही माझी चर्चा झाली. देशमुख यांना नव्याने जिल्ह्यात नेतृत्व तयार होऊ द्यायचे नाही. मी स्पष्ट व निर्भीडपणे बोलणारा व्यक्ती आहे. राजकीय नेत्यांना असे लोक चालत नाहीत. म्हणून मला विश्वासात न घेता अनिल देशमुख यांनी हे कटकारस्थान रचून मला पदावरून दूर केले, असा आरोप बाबा गुजर यांनी केला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असून, शरद पवार यांना डोळ्यापुढे ठेवून काम करणार आहे. अजित पवार यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी यांना घेऊन मुंबई येथे दि. ५ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही गुजर यांनी स्पष्ट केले आहे.