काँग्रेससोबत आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादीची प्रगती झाली नाही, प्रफुल्ल पटेलांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:26 AM2022-06-13T10:26:43+5:302022-06-13T10:29:41+5:30
पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली.
नागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची प्रगती होऊ शकली नाही. आघाडी असल्याने जेव्हा जेव्हा निवडणुकीत जागा वाटपाची वेळ यायची, तेव्हा तेव्हा काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीला जागा मिळू शकल्या नाहीत. त्याचा विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही परिणाम झाला. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीच्या प्रगतीला काँग्रेसची आघाडी अडचणीची ठरल्याची खंत राज्यसभेचे नवनियुक्त खासदार व माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले.
पटेल यांची राज्यसभेत निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. याप्रसंगी पटेल यांनी आघाडीची खंत व्यक्त करताना राष्ट्रवादीने २००४ मध्ये हातची संधी सोडल्याचीही भावना व्यक्त केली. २००४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी राष्ट्रवादीला मिळाली होती. विदर्भात ११, तर राज्यात काँग्रेसपेक्षा जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले होते. तरीही काँग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरला. तेव्हाच जर राष्ट्रवादीने हट्ट धरला असता आणि मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असता, तर विदर्भातील चित्र वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.
- मनपात राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी
या कार्यक्रमात नागपुरातील कार्यकर्त्यांनी निधी संदर्भातील खंत व्यक्त केली. तेव्हा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सरकारमध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, निधीला कमी पडू देणार नाहीत. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मिशन ट्वेंटी ठेवा. तरच मनपात राष्ट्रवादीशिवाय पर्याय राहणार नाही, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.