नागपुरात राष्ट्रवादीने पेटविली निवडणुकीची फुलझडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:51 AM2020-11-19T10:51:10+5:302020-11-19T10:51:37+5:30
दिवाळी मिलन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात निवडणुकीची फुलझडी पेटविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी मिलन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची फुलझडी पेटविली. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे नगरसेवक वाढवायचे आहेत. त्यासाठी आतापासून नियोजन करा. विविध संस्था, संघटना, व्यक्तींशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळवा, अशा सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला.
राष्ट्रवादीतर्फे येथे दिवाळी मिलन सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये, दिलीप पनकुले, प्रशांत पवार, ईश्वर बाळबुधे, शब्बीर विद्रोही, नूतन रेवतकर, रवी पराते, डॉ. विलास मूर्ती उपस्थित होते.
अहीरकर यांनी सांगितले की, शहरातील विविध संघटनांना जोडणे सुरू आहे. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे दोन वर्षांच्या कामाचा अहवाल गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.
काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी
दिवाळी मिलन सोहळा असल्यामुळे पदाधिकारी निवडणुकीवर सावरतच बोलले. मात्र, कार्यक्रमानंतर निवडणूक रणनितीवर चर्चा रंगल्या. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आघाडीबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जागावाटपासाठी काँग्रेससोबत वाटाघाटी होते. मात्र, काँग्रेसकडून सन्मानजनक प्रस्ताव दिला जात नाही. राष्ट्रवादीचे शहरात अस्तीत्वच नाही, अशी भाषा वापरली जाते. असेच सुरू राहिले तर स्वबळाचा विचार करायला हरकत नाही, अशा भावनाही उपस्थितांनी व्यक्त केल्या.